आमचं शहर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर; अर्ध्या तासात पेट्रोल बॉम्ब कुठून आले? संजय शिरसाटांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 04:42 PM2023-03-30T16:42:11+5:302023-03-30T16:42:39+5:30
'ही घडवून आणलेली दंगल आहे, असा माझा आरोप आहे. बोलायचं एक आणि करायचं दुसरं, हे शहराच्या शांततेसाठी योग्य नाही.'
छत्रपती संभाजीनगर: आज राम नवमी आहे, याला गालबोट लावण्याचा प्रयत्न शहरात झाला आहे. शहरातील किराडपुरा परिसरात असलेल्या राम मंदिराजवळ काल मध्यरात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटाकून दगडफेक आणि जाळपोळीची घटना झाली. या घटनेत पोलिसांच्या गाड्यासह इतर अनेक गाड्या जाळण्यात आल्या. या घटनेनंतर शहरातील पूर्व मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.
पेट्रोल बॉम्ब कुठून आले?
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना संजय शिरसाट म्हणाले, 'इम्तियाज जलील यांनी ज्याप्रकारे स्टेटमेंट दिलं, त्याचा परिणाम युवा वर्गावर झाला आहे. आज कोणी कितीही नकार देत असले, तरी एका विशिष्ट युवा वर्गाने हे घडवून आणलं आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, समाजात तेढ निर्माण करू नका. या घटनेची सुरुवात दोन गटात झाली, मग अवघ्या अर्ध्या तासात यांच्याकडे पेट्रोल बॉम्ब कुठून आले? अर्ध्या तासात पेट्रोल बॉम्ब तयार होतात?' असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
आमचं शहर हिटलिस्टवर
ते पुढे म्हणाले, 'आमचं शहर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे. भारतात ज्या अतिरेकी कारवाया होतात, त्यात आमच्या शहराचे नाव आहे. याच्याकडे पोलिसांनी बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आम्हाला शहराची शांतता बिघडवायची नाही. सध्या रमजानचा महिना सुरू आहे, आज रामनवमी आहे आणि लवकरच जैन समाजाचा उत्सवर आहे. अशा परिस्थितीत शहराचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. मी याबाबत पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांशीबी बोललो. त्यांनी सांगितलं की, यात कोणत्याही जाती-धर्माचा असो, त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे,' अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
घडवून आणलेली दंगल
'ही घडवून आणलेली दंगल आहे, असा माझा आरोप आहे. बोलायचं एक आणि करायचं दुसरं, हे शहराच्या शांततेसाठी योग्य नाही. अंबादास दानवेंनी मूर्खासारख स्टेटमेंट करू नये. राम नवमी हिंदूंचा सण आहे आणि याच सणावेळी आम्ही घडनू आणू, हे अतिशय मूर्खपणाचे स्टेटमेंट आहे. तुम्हाला बोलायला येत नाही, तर बोलू नका. उगाच शहराची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न नका करू. या घटनेत जो दोषी आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग तो शिंदे गटाचा असो, ठाकरे गटाचा असो किंवा इतर कुणीही असो. ही राजकारण करण्याची वेळ नाही,' असंही संजय शिरसाट यावेळी म्हणाले.