छत्रपती संभाजीनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गुरमे बनले दुसऱ्यांदा आयर्नमॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 08:00 PM2023-08-07T20:00:07+5:302023-08-07T20:00:21+5:30

इस्टोनियातील टॅलीन येथे केला पराक्रम; अशी कामगिरी करणारे ठरले भारतातील पहिलेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Chhatrapati Sambhajinagar Senior Police Inspector Sandeep Gurme became Ironman for the second time | छत्रपती संभाजीनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गुरमे बनले दुसऱ्यांदा आयर्नमॅन

छत्रपती संभाजीनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गुरमे बनले दुसऱ्यांदा आयर्नमॅन

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : १४ अंश सेल्सिअस तापमान, रक्त गोठावणारे थंड तापमान, जोरदार वारा अशा प्रतिकूल परिस्थितीवर तीव्र इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या बळावर मात करीत छत्रपती संभाजीनगर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी शनिवारी युरोपमधील इस्टोनियामध्ये टॅलीन येथे झालेली ट्रायथलॉन स्पर्धा सलग दुसऱ्यांदा यशस्वीपणे पूर्ण करीत ‘आयर्नमॅन’चा किताब पटकावला. गतवर्षीही ऑगस्ट महिन्यातच त्यांनी आयर्नमॅनचा किताब पटकावण्याचा भीमपराक्रम केला होता.

टॅलीन येथे झालेल्या या स्पर्धेत ३.८ कि. मी. समुद्रात पोहणे, १८० कि. मी. सायकलिंग आणि ४२.५ कि. मी. धावणे हे तिन्ही प्रकार फक्त १७ तासांत पूर्ण करण्याचे खडतर आव्हान संदीप गुरमे यांच्यासमोर होते. मात्र, संदीप गुरमे यांनी शारीरिक क्षमतेचा कस पणाला लागणारी ही ट्रायथलॉन स्पर्धा एकूण १६ तास २९ मिनिटांत यशस्वीपणे पूर्ण केली. संदीप गुरमे यांनी ३.८ कि. मी. हे स्वीमिंगचे अंतर १ तास ५६ मिनिटांत, सायकलिंगचे १८० कि. मी. आव्हान ७ तास ३७ मिनिटांत आणि ४२.५ कि. मी. हे रनिंगचे अंतर ६ तास ३६ मिनिटांत पूर्ण करीत आयर्नमॅनच्या किताबावर शिक्कामोर्तब केले. गुरमे यांनी ३.८ कि. मी. स्वीमिंग करताना १४ सेल्सिअस तापमान आणि रक्त गोठावणाऱ्या बर्फासारख्या थंड पाण्यात पोहण्याचे तसेच सायकलिंग करताना जोरदार हवा व रनिंग करताना थंडी आणि पाऊस अशा प्रतिकूल परिस्थितीला यशस्वीपणे सामोरे जात आपले लक्ष्य गाठले.

बालपणापासूनच ॲथलेटिक्सची आवड असणाऱ्या संदीप गुरमे यांनी २०१९ मध्ये विरळ ऑक्सिजन असलेल्या ६ हजार ७५० फूट उंचीवरील मनाली ते १७ हजार ५७७ फूट उंचीवर असणाऱ्या लेह, लडाख, खारदुगला हे ५५० कि. मी. या अंतरात सायकलिंग करण्याचाही पराक्रम केला होता. अभिजित नारगोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप गुरमे हे आयर्नमॅन स्पर्धेसाठी गत तीन वर्षांपासून कठोर सराव करीत होते. या यशाबद्दल संदीप गुरमे यांचे पोलिस आयुक्त मनोज लोहिया व पोलिस विभागाने अभिनंदन केले आहे.

Web Title: Chhatrapati Sambhajinagar Senior Police Inspector Sandeep Gurme became Ironman for the second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.