छत्रपती संभाजीनगर हादरले; अल्पवयीन मुलीवर मित्रांकडून अत्याचार, व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 12:17 PM2023-06-09T12:17:02+5:302023-06-09T12:17:23+5:30
मैत्रिणीच्या माध्यमातून त्याच्यासोबत ओळख झाली, त्याने अत्याचार करून दुष्कृत्यात मित्रांनाही केले सहभागी
छत्रपती संभाजीनगर : इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आठवीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीवर सहाजणांनी सलग सहा महिने अत्याचार केल्याच्या घटनेने शहर हादरले. गुरुवारी ही घटना समोर आली. शाळेतल्या मैत्रिणीच्या माध्यमातून पूर्वा (नाव काल्पनिक आहे) ची आरोपी अक्षय चव्हाणसोबत ओळख झाली होती. अक्षयने मात्र मैत्रीचा गैरफायदा घेत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्याचे मोबाइलमध्ये चित्रण करून तिला ब्लॅकमेल करत पुढील सहा महिने त्याच्या मित्र, नातेवाइकानेदेखील तिच्यावर असह्य अत्याचार केले. एकीकडे ब्लॅकमेलिंगखाली सातत्याने सुरू असलेले अत्याचार व कुटुंबासोबत सुरू झालेल्या मतभेदांमुळे तिने घर सोडले. मात्र, वेळीच ती दामिनी पथकाच्या हाती लागल्याने हा खरा प्रकार समोर आला व गुरुवारी अखेर आरोपींना अटक करण्यास सुरुवात झाली.
१४ वर्षीय पूर्वा वडील, आजीसह सातारा परिसरात राहते. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या पूर्वाची एका मैत्रिणीच्या माध्यमातून वयाने मोठा असलेल्या अक्षयसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर पूर्वा मोठ्या विश्वासाने त्याच्यासोबत बोलायला लागली. अक्षयने स्वत:ला चांगली व्यक्ती म्हणून सादर करत तिचा विश्वास जिंकला. त्यांच्यात मोबाइल क्रमांकाची देवाणघेवाण झाल्यानंतर त्यांचे नियमित व्हॉटस्ॲपवर बोलणे सुरू झाले. अक्षयने तिला त्याच्या जाळ्यात ओढणे सुरू केले व ऑक्टोबर २०२२ मध्ये भेटण्यासाठी गळ घातली व पहिल्याच भेटीत तिच्यावर अत्याचार केेले. शिवाय, सर्व घटना चोरून मोबाइलमध्ये चित्रितदेखील केली.
कुटुंबातला एकटेपणा, व्यक्त कोणाकडे होणार ?
चौदा वर्षीय पूर्वावर सातत्याने अत्याचार सुरू झाले. अक्षयने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मित्रांकडूनही तिच्यावर अत्याचार करवले. एक-दोन नाही, तर तब्बल सहा मित्रांनी तिच्यावर अनन्वित अत्याचार केले. सातत्याने विविध ठिकाणी नेत ब्लॅकमेल करत अत्याचार करून निर्दयीपणे छायाचित्रण करत गेले. पूर्वाचे वडील कामानिमित्त नेहमी घराबाहेर असतात. आई आजारी असल्याने मामाकडे राहते. दिवसभर घरात वृद्ध आजी व पूर्वा एकट्याच असायच्या. त्यामुळे मित्राकडून सुरू झालेल्या अत्याचाराबाबत कोणाला सांगायचे, कोणाकडे व्यक्त व्हायचे हा प्रश्न पूर्वासमोर होता. यातच तिला पुन्हा एका मित्राने तिच्या या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचे ठरवत साेबत पळून जाण्याचे आश्वासन दिले. तणावाखाली गेलेल्या पूर्वाचा त्याच्यावर विश्वास बसला. त्याच्या सांगण्यावरून १८ मे रोजी तिने घरातील वीस हजार रोख, सोन्याचे दागिने, वडिलांचा मोबाइल घेऊन पोबारा केला. रात्री बारा वाजता एकटी रेल्वे स्थानकावर मित्राची वाट पाहत उभी होती. मित्र मात्र आलाच नाही. स्थानकावरील एका पाणी विक्रेत्याला हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने रेल्वे पोलिसांना कळवले. रेल्वे पोलिसांनी शहर पोलिसांना कळवले. दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक अनिता फसाटे यांनी पथकासह धाव घेत तिला ताब्यात घेतले.
विश्वासात घेतल्यावर पूर्वाने कथन केली आपबिती
दामिनी पथकाने विश्वासात घेतल्यानंतर पूर्वाने तिच्यावर ओढवलेली अत्याचारांची श्रृंखलाच विशद केली. पोलिसही हे ऐकून थक्क झाले. मानसिकताच खराब झाल्याने तिने घरीदेखील जाण्यास नकार दिला. त्यानंतर तिला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तिचे समुपदेशन केले. जवळपास वीस दिवस समुपदेशन केल्यानंतर पूर्वाने तक्रार देण्याची तयारी दाखवली. उपायुक्त शिलवंत नांदेडकर, निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी गुरुवारी यात बाललैंगिक अत्याचार, बलात्कार, अपहरण, आयटी ॲक्ट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. जवळपास पाच पथकांनी बारा तास शोध घेत यातील चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यापैकी अक्षयच्या एका अल्पवयीन नातेवाइकाचा समावेश आहे. अन्य दोघांचा शोध सुरू असून, एक आरोपी विवाहितदेखील असल्याचे सूत्रांनी सांगितले.