छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्स्प्रेस-वे अलाइन्मेंट बदलणार, थेट 'समृद्धी' महामार्गला जोडणार
By विकास राऊत | Published: September 5, 2024 07:56 PM2024-09-05T19:56:36+5:302024-09-05T19:57:42+5:30
पूर्वीचे अलाइन्मेंट रद्द होणार असल्याची चर्चा; यासाठी बदलणार अलाइन्मेंट?
छत्रपती संभाजीनगर : एनएचएआय आणि एमएसआरडीसीने केलेले पुणे ते छत्रपती संभाजीनगर या एक्स्प्रेस-वेचे जुने अलाइन्मेंट बदलण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्स्प्रेस-वेसाठी एनएचएआय-एमएसआयडीसीमध्ये जून महिन्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. असे असताना जुने अलाइन्मेंट बदलण्याची चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर ते पुणे हे २२५ किमी अंतर दोन ते सव्वादोन तासांत पूर्ण करता येईल. असा हा नवीन मार्ग असेल. त्यासाठी अलाइन्मेंट अंतिम होत आहे. छत्रपती संभाजीनगर ते शिरूरपर्यंत चार टोलनाके असतील. टोलच्या उत्पन्नातून विद्यमान छत्रपती संभाजीनगर, नगर ते पुणे हा रस्ता चांगला करण्यात येणार आहे. नागपूर ते जालना समृद्धीमार्ग व पुढे छत्रपती संभाजीनगर ते पुणे नवीन महामार्गावरून साडेचार तासांत प्रवास होणे शक्य होईल, असा दावा करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर ते पुणे या नवीन (एक्स्प्रेस-वे) या २२५ किमीच्या द्रूतगती महामार्गाला २६ महिन्यांनी मंजुरी दिल्यावर बीओटीवर हा सहापदरी मार्ग बांधण्याचे निश्चित झाले. २५ हजार कोटींच्या या प्रकल्पासाठी एनएचएआय आणि एमएसआयडीसीमध्ये सोमवारी सामंजस्य करार जूनमध्ये झाला. महाराष्ट्र पायाभूत सुविधा महामंडळाकडे (एमएसआयडीसी) हा रस्ता हस्तांतरित केला. ३ हजार कोटींचे कर्ज हुडकोकडून उपलब्ध होईल.
असे आहे अलाइन्मेंट
बिडकीनला जोडणारे अलाइन्मेंट बदलण्यात येणार आहे. आधीचे अलाइन्मेंट जोड रस्त्याला बिडकीन वसाहतीच्या दक्षिण-पूर्व टोकाला जोडणार होती. नवीन अलाइन्मेंटनुसार बिडकीनला जोडणारा रस्ता छत्रपती संभाजीनगर-पुणे एक्स्प्रेसवेवरून बिडकीन ऑरिक वसाहतीच्या लगत थेट पैठण रस्त्याला जोडेल आणि पुढे वाळूज च्या दक्षिण-पश्चिम दिशेने समृद्धी महामार्गाला जोडण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. असे झाल्यास बिडकीन नोड थेट समृद्धी महामार्गाला जोडले जाईल.
यासाठी बदलणार अलाइन्मेंट
जालना रस्त्यावरील केम्ब्रिज शाळेपासून सुरू होणारे अलाइन्मेंट शहरातील प्रवाशांसाठी सोयीचे नव्हते आणि पुण्याच्या विरुद्ध दिशेने प्रवासाला सुरुवात करावी लागली असती. आता नवीन बदलामुळे पैठण रोड, बिडकीन जोड रस्त्याने थेट या द्रूतगती महामार्गाला जाता येईल, यामुळे प्रवासाचे अंतर कमी होईल. केंब्रिज शाळेलगत सुरू होणार रस्ता समृद्धीला जोडण्यात येईल. तसेच, शेंद्रा वसाहत, बिडकीन, कसाबखेडा, असा अर्धवर्तुळाकार बायपास झाल्यास, शहरालगत गोलाकार बाह्यवळण रस्ता निर्माण होईल.
एनएचएआयचे मत असे
छत्रपती संभाजीनगर ते पुणे या रस्त्याचे काम आमच्याकडे नाही, परंतु जुने अलाइन्मेंट बदलले की नाही, हे माहिती नाही. तसे तर बदलता येत नाही, परंतु काही धोरण असेल तर बदलता येऊ शकते, असे मत एनएचएआयच्या वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केले.
एमएसआरडीसी काय म्हणते
एनएचएआयकडे जेव्हा हा रस्ता देण्यात आला होता, त्यावेळेस भूसंपादन अथॉरिटी म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाकडे जबाबदारी देण्यात आली होती, परंतु दोन महिन्यांपूर्वी राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे त्या रस्त्याचे काम एका कराराने वर्ग झाले आहे. त्यामुळे अलाइन्मेंट व भूसंपादनाशी एमएसआरडीसीचा काही संबंध नाही.