छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्सप्रेस-वे घोषणेपुरताच? १८ महिन्यांत फक्त अधिसूचना निघाली
By विकास राऊत | Published: October 11, 2023 12:09 PM2023-10-11T12:09:15+5:302023-10-11T12:10:03+5:30
भारतमाला टप्पा-२ मध्ये ग्रीनफिल्डमध्ये महामार्ग प्रस्तावित
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा नवीन (एक्सप्रेस-वे) द्रुतगती महामार्ग नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाने करण्याच्या घोषणेला १८ महिने झाल्याने हा मार्ग घोषणेपुरताच होता का, असा प्रश्न पडला आहे. १० महिन्यांपूर्वी या मार्गासाठी अधिसूचना काढण्यात आली होती. पुढे केंद्र शासनाच्या कॅबिनेटपर्यंतही सदरील प्रस्ताव अद्याप पोहोचलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. प्रस्ताव येणे, डीपीआर तयार करणे, निविदा काढणे, त्याला मंजुरी, भूसंपादनासाठी तरतूद; हे पाहता लोकसभा निवडणुकीनंतरच या रस्त्याच्या कामासाठी निर्णय होईल, असे बोलले जात असून १२ हजार कोटींचा हा रस्ता येणाऱ्या काळात १५ हजार कोटींवर जाईल.
या महामार्गासाठी प्राथमिक अधिसूचना डिसेंबर २०२२ मध्ये निघाली. जिल्ह्यातील २४ गावांतून या मार्गासाठी भूसंपादन करण्याचे स्पष्ट झाले. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या समन्वयातून समृद्धी महामार्गाच्या पॅटर्ननुसार भूसंपादन करण्यासाठी एक बैठक झाली. छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे हे तीन जिल्हाधिकारी, एनएचएआयचे दोन कार्यालय आणि भूसंपादन संस्था एमएसआरडीसी यांच्यात समन्वय होणेदेखील गरजेचे असणार आहे. कुठल्याही कार्यालयाकडे या महामार्गाबाबत ठोस माहिती नाही.
काय म्हणाले होते गडकरी.....?
१० ते १२ हजार कोटींचा हा महामार्ग असून पुढच्या दाैऱ्यात या मार्गाचे भूमिपूजन करण्यासाठी मी येईन. छत्रपती संभाजीनगर ते पुणे हे २२५ कि.मी. अंतर सव्वा तासात पूर्ण करता येईल. असा हा नवीन मार्ग असेल. त्यासाठी बीड ते अहमदनगर ते पैठणमार्गे अलायमेंट अंतिम झाले आहे. १४० कि.मी. प्रति तासाने वाहने यावरून धावतील.
केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी (२४ एप्रिल २०२२, येथील सभेत)
दोन तासांत पुण्याला जाण्याचा दावा....
छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा नवीन द्रुतगती महामार्ग नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया बांधणार आहे. सुमारे १२ हजार कोटींचा हा महामार्ग असून यासाठी भूसंपादनाच्या अनुषंगाने अधिसूचना अद्याप निघालेली नाही. जिल्ह्यातील अंदाजे २० गावांतून हा रस्ता जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर ते पुणे हे २२५ कि.मी. अंतर दोन तासांत पूर्ण करता येईल, असा हा नवीन मार्ग असेल. त्यासाठी बीड ते अहमदनगर ते पैठणमार्गे अलायमेंट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
‘त्या’ अधिसूचनेला झाले १० महिने....
छत्रपती संभाजीनगर ते पुणे या महामार्गाच्या भूसंपादनासाठी अधिसूचना ३ (ए) निघून १० महिने झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सात तर पैठण तालुक्यातील १७ गावांतून मार्ग जाणार आहे. भारतमाला टप्पा- दाेनमध्ये ग्रीनफिल्डमध्ये हा मार्ग प्रस्तावित आहे. तालुक्यातील पीरवाडी, हिरापूर, सुंदरवाडी, झाल्टा, आडगाव बुद्रुक, चिंचोली, घारदोन तर पैठण तालुक्यातील वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापूसवाडी, वडाळा, बवा, वरुडी बुद्रुक, पाचळगाव, नारायणगाव, करंजखेडा, आखतवाडा, वाघाडी, दडेगाव जहाँगीर, पोटगाव, सायगाव, पैठण परिसरातून रस्ता जाणार आहे.