छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्स्प्रेस-वे होणार तीन फेसमध्ये; दोन टप्प्यांसाठी १४ हजार कोटी मंजुर
By विकास राऊत | Published: September 24, 2024 07:08 PM2024-09-24T19:08:18+5:302024-09-24T19:08:50+5:30
या मार्गासाठी २ हजार ६३३ हेक्टर जमीन संपादन करण्यात येईल. तीन फेसमध्ये महामार्गाचे काम होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा नवीन द्रुतगती महामार्ग (एक्स्प्रेस-वे) २५ हजार कोटींतून बांधण्यात येणार असला तरी पहिल्या दोन टप्प्यांनाच (फेस : १ व २) सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या २०५ किलोमीटरच्या द्रुतगती मार्गास १४ हजार ८८६ कोटी रुपये खर्च येईल. या मार्गाचे काम बीओटी तत्त्वावर करण्यात येईल. काम पूर्ण झाल्यानंतर २००८ च्या पथकर धोरणानुसार वाहनांवर पथकर लावण्यात येईल. या मार्गासाठी २ हजार ६३३ हेक्टर जमीन संपादन करण्यात येईल. तीन फेसमध्ये महामार्गाचे काम होणार आहे. पहिल्या दोन फेसमध्ये छत्रपती संभाजीनगर ते शिरूरपर्यंत मार्ग असेल. शिरूर ते पुणे या मार्गाचे काम तिसऱ्या फेसमध्ये होणार आहे. दोन फेससाठी १४ हजार ८८६ कोटी, तर तिसऱ्या फेससाठी १० हजार कोटींचा खर्च येईल. परंतु, त्याचा निर्णय सोमवारच्या बैठकीत झाला नाही.
या गावांतून जाणार मार्ग
छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गाच्या भूसंपादनासाठी अधिसूचना ३ (ए) काढून २१ महिने झाले. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पीरवाडी, हिरापूर, सुंदरवाडी, झाल्टा, आडगाव बुद्रुक, चिंचोली, घारदोन, तर पैठण तालुक्यातील वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापूसवाडी, वडाळा, बवा, वरुडी बुद्रुक, पाचळगाव, नारायणगाव, करंजखेडा, आखतवाडा, वाघाडी, दडेगाव जहाँगीर, पोटगाव, सायगाव, पैठण परिसरातून हा मार्ग प्रस्तावित आहे. बिडकीनमध्ये अलायन्मेंट बदलण्यात येणार आहे.
येत्या आठवड्यात अध्यादेश निघेल
५ सप्टेंबरच्या कॅबिनेटमध्ये या मार्गाऐवजी जुन्या छत्रपती संभाजीनगर ते पुणे रस्त्याबाबत चर्चा होऊन नूतनीकरणाची तरतूद केली होती. त्यानंतर २३ सप्टेंबरच्या कॅबिनेटमध्ये एक्स्प्रेस-वेचा सुधारित प्रस्ताव ठेवण्यात आला. जून २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून या मार्गाचे काम करण्यासाठी एनएचएआय आणि शासनामध्ये करार झाला. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर (अहमदनगर), पुणे हे तीन जिल्हाधिकारी कार्यालय आणि एमएसआयडीसी समन्वयाने भूसंपादन करतील. येत्या आठवड्यात कामाचा अध्यादेश निघेल, असे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.