छत्रपती संभाजीनगर ते पुणे ग्रीनफ्लीड एक्सप्रेस-वेला ‘अर्थ’ खात्याचा ब्रेक

By विकास राऊत | Published: September 7, 2024 07:03 PM2024-09-07T19:03:09+5:302024-09-07T19:03:36+5:30

छत्रपती संभाजीनगर ते पुणे जुन्या रस्त्यालाच अद्ययावत करण्याचा विचार

Chhatrapati Sambhajinagar to Pune Greenfield Expressway work facing break of finance ministry | छत्रपती संभाजीनगर ते पुणे ग्रीनफ्लीड एक्सप्रेस-वेला ‘अर्थ’ खात्याचा ब्रेक

छत्रपती संभाजीनगर ते पुणे ग्रीनफ्लीड एक्सप्रेस-वेला ‘अर्थ’ खात्याचा ब्रेक

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा नवीन (एक्स्प्रेस-वे) द्रुतगती महामार्ग २५ हजार कोटींतून बांधण्यात येणार आहे. सध्या या महामार्गाचे काम ‘अर्थ’ संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ५ ऑगस्टच्या कॅबिनेटमध्ये या मार्गाऐवजी जुन्या छत्रपती संभाजीनगर ते पुणे या रस्त्याबाबत चर्चा होऊन नूतनीकरणासाठी २ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. पुढच्या कॅबिनेटमध्ये एक्स्प्रेस-वे बाबत चर्चा होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ सूत्रांनी दिली. या मार्गासाठी २९ महिन्यांपूर्वी घोषणा झाली होती. जून २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून या मार्गाचे काम करण्यासाठी एनएचएआय आणि शासनामध्ये करार झाला. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर (अहमदनगर), पुणे हे तीन जिल्हाधिकारी कार्यालय आणि एमएसआयडीसी भूसंपादन समन्वयाच्या अनुषंगाने सध्या काहीही चर्चा नाही.

गुरुवारी काय झाले, काय निर्णय घेतले...
मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवलेल्या पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे प्रकल्पावर वित्त विभागाने गुरुवारच्या बैठकीत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची चर्चा आहे. सध्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कोट्यवधी रुपयांच्या कामांचे सरकारवर ओझे आहे. त्यामुळे ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे या नवीन मार्गाची गरज आहे काय, या व इतर प्रश्नांमुळे बैठकीत तो प्रस्ताव चर्चेविना बाजूला ठेवल्याचे बोलले जात आहे. प्रस्तावात सुधारणा करून तो पुन्हा चर्चेसाठी येईल. मात्र, पुणे ते शिरुर या ५३ कि.मी.मार्गाच्या सहापदरीकरणाचे काम एमएसआयडीसी करील. यासाठी ७ हजार ५१५ कोटी खर्चास तर शिरूर-अहमदनगर-संभाजीनगर मार्गासाठी २ हजार ५० कोटी खर्चास मंजुरी दिली.

त्या अधिसूचनेला झाले २१ महिने....
छत्रपती संभाजीनगर ते पुणे या महामार्ग भूसंपादनासाठी अधिसूचना ३ (ए) काढून २१ महिने झाले. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पीरवाडी, हिरापूर, सुंदरवाडी, झाल्टा, आडगाव बुद्रुक, चिंचोली, घारदोन, तर पैठण तालुक्यातील वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापूसवाडी, वडाळा, बवा, वरुडी बुद्रुक, पाचळगाव, नारायणगाव, करंजखेडा, आखतवाडा, वाघाडी, दडेगाव जहाँगीर, पोटगाव, सायगाव, पैठण परिसरातून मार्ग जाणे प्रस्तावित आहे. बिडकीनमध्ये अलायन्मेंट बदलण्यात येणार आहे. त्यासाठी हालचाली सुरू आहेत.

महामार्गाचे काम होईल...
छत्रपती संभाजीनगर ते पुणे या एक्स्प्रेस-वेच्या कामाला मंजुरी मिळेल, त्याचे काम लवकरच सुरू होईल.
- अतुल सावे, गृहनिर्माण मंत्री.

पुढच्या कॅबिनेटमध्ये चर्चा...
नवीन महामार्गाच्या प्रस्तावाबाबत पुढच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे.
- एमएसआयडीसी, वरिष्ठ सूत्र.

Web Title: Chhatrapati Sambhajinagar to Pune Greenfield Expressway work facing break of finance ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.