छत्रपती संभाजीनगरचे ग्रामदैवत खंडोबाची पालखी मिरवणूक वादाच्या भोवऱ्यात; काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 11:50 IST2024-12-05T11:49:36+5:302024-12-05T11:50:00+5:30
चंपाषष्ठीला खंडोबाची मूळ मूर्ती पालखीतून हलवू नका; ट्रस्टींचा पुरातत्त्व खात्याकडे आक्षेप

छत्रपती संभाजीनगरचे ग्रामदैवत खंडोबाची पालखी मिरवणूक वादाच्या भोवऱ्यात; काय आहे प्रकरण?
छत्रपती संभाजीनगर : शहराचे ग्रामदैवत असलेल्या सातारा गावातील खंडोबा मंदिरात परंपरेनुसार सालाबादाप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात खंडोबा चंपाषष्ठी उत्सव यात्रा भरविली जाते. घटस्थापना झाल्यानंतर चंपाषष्ठीच्या दिवशी परंपरेनुसार जहागीरदारांच्या वाड्यात पालखी मिरवणूक काढण्यात येत असते. जहागीरदार गेल्यापासून दांडेकर हे त्या वाड्यात वास्तव्य करीत असून, त्यामुळे ही पालखी मिरवणूक आता दांडेकरांच्या वाड्यात जात आहे. मात्र, यावर्षी ही पालखी मिरवणूक वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
देवस्थानचे अध्यक्ष रमेश चोपडे, सचिव साहेबराव पळसकर यांचे म्हणणे आहे की, पालखी मिरवणुकीत मूर्तीच्या प्रतिकृतीची मिरवणूक काढावी. मात्र, दांडेकर हे मूळ मूर्तीची मिरवणूक काढावी, असे म्हणत आहेत. पुरातत्त्व विभाग यावर लेखी उत्तर देत नाही, तोवर हा वाद चालूच राहील, असे बोलले जात आहे.
खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष व सचिव यांनी याबाबत ८ नोव्हेंबर २०२४ रोजी पुरातत्त्व विभागास एक पत्र लिहिले आहे. पत्रात अध्यक्ष व सचिवांनी दांडेकर यांच्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत पुरातत्त्व विभागाने या पत्राला कोणतेही उत्तर दिलेले नाही.
पत्रातील महत्त्वाचे मुद्दे
-जहागीरदार यांनी वाडा सोडल्यानंतर मूळ मूर्ती दांडेकर यांच्या वाड्यात घेऊन जाण्यास अनेक गावकरी व भक्तांचा विरोध होता.
- उत्सवात कोणा एका व्यक्तीच्या घरी मूर्ती किंवा प्रतिमूर्ती देणे, अशी कोणतीही परंपरा नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
-पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत, अधिकारात आहे. मूर्ती हलविण्याबाबत आपले मार्गदर्शन आवश्यक आहे. मूर्ती उत्सव काळात कुठेही न हलवण्याबाबत विश्वस्त मंडळाने यापूर्वीही ठराव संमत केलेला आहे.
कोणतेही लेखी उत्तर नाही...
पुरातत्त्व विभागाकडून यासंदर्भात कोणतेही लेखी उत्तर आले नसल्याचे देवस्थानचे सचिव साहेबराव पळसकर यांनी सांगितले आहे. यात्रेच्या शेवटच्या दिवसापर्यंत उत्तर आले नाही तर आम्ही प्रतिकृतीवर मिरवणूक काढू, असे ट्रस्टचे अध्यक्ष, सचिव यांचे म्हणणे आहे. देवस्थानचे विश्वस्त दिलीप दांडेकर, विठ्ठल देवकर, अन्य विरोधी ट्रस्टी हे मात्र पुरातत्त्व खात्याच्या तोंडी सूचनेनुसार मूळ मूर्तीची मिरवणूक काढण्यावर ठाम आहेत.
देवस्थानाने पूर्ण सुरक्षा राखत मिरवणूक काढावी...
पुरातत्त्व विभागाच्या साहाय्यक संचालक जया वाहने यांनी सांगितले की, मंदिरात मूळ मूर्ती नसल्याने पुरातत्त्व विभागाचा संबंध येत नाही. पालखी मिरवणूक देवस्थानने पूर्ण सुरक्षा राखत मिरवणूक काढावी, असे तोंडी सांगण्यात आले आहे.