राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल विचारताच चंद्रकांत खैरे यांनी हात जोडले अन्...; एकच वाक्य बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 06:22 PM2024-04-10T18:22:36+5:302024-04-10T18:27:52+5:30
राज ठाकरे यांच्या या भूमिकेसंदर्भात महाविकास आघाडीचे औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार, शिवसेना नेते तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी हात जोडून एका वाक्यात प्रतिक्रिया दिली.
लोकसभा निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी आपली भूमिका स्पष्ट करत भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यानंतर महायुतीची ताकद नक्कीच वाढली आहे. आता, राज ठाकरे यांच्या या भूमिकेसंदर्भात महाविकास आघाडीचे औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार, शिवसेना नेते तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी हात जोडून एका वाक्यात प्रतिक्रिया दिली.
खरे तर, राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर, महायुती आणि विरोधी पक्षांतीलही अनेक नेत्यांकडून राज यांच्या भूमिकेसंदर्भात प्रतिक्रिया येत आहेत. यातच, राज ठाकरे काल म्हणाले मोदींना पाठिंबा देणार, पण अनेक जण म्हणतायेत की, त्यांची भूमिका संभ्रमात आहे? असा प्रश्न चंद्रकांत खैरे यांना केला असता, त्यांनी लगेच हात जोडले आणि मी त्यांच्या बद्दल काही बोलत नाही, असे म्हणाले. यावर, त्यांच्याबद्दल बोलणे का टाळत आहात? असे विचारले असता, एवढ्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत आपण कशाला बोलायचे, असे म्हणत खैरे यांनी राज ठाकरे यांच्या संदर्भात प्रतिक्रिया देणे नम्रपणे टाळले. ते टीव्ही ९ सोबत बोलत होते.
"मला तर यश मिळणारच" -
संभाजीनगर जिल्ह्यासाठी अद्यापही महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नाही, यासंदर्भात बोलताना खैरे म्हणाले, "माझी उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही पूर्ण मेहनतीने काम करत आहोत. यश मिळणारच आहे. कारण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे किती फिरत आहेत, किती मेहनत करत आहेत.
महायुतीत आपसात खूप भांडण सुरू आहे -
यांचे (महायुती) आपसात खूप भांडण सुरू आहे. ते होऊ द्या आम्हाला काही देणे घेणे नाही. त्यांनी कुणीही माणूस दिला, तरी तो खूप मोठा माणूस आहे, असे समजून त्याला पाडायचे. म्हणजे शक्ती निर्माण होते. आपण नगण्य आहे असे म्हटले तर तो ओव्हर कॉन्फिडन्स होतो. तो ओव्हर कॉन्फिडन्स न होता त्याला पाडायचे. यासाठी सर्वशक्ती एत्रित आली आहे."