छत्रपती संभाजीनगरात दोन डबल डेकर बस येणार; पर्यटन स्थळांना प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 20:05 IST2024-12-05T20:05:09+5:302024-12-05T20:05:20+5:30

ई-डबल डेकर बस १७ फूट उंच राहणार आहे. त्यामुळे मार्ग ठरविताना या बाबीचा विचार करावा लागणार आहे

Chhatrapati Sambhajinagar will have two double decker buses; Preference for tourist destinations | छत्रपती संभाजीनगरात दोन डबल डेकर बस येणार; पर्यटन स्थळांना प्राधान्य

छत्रपती संभाजीनगरात दोन डबल डेकर बस येणार; पर्यटन स्थळांना प्राधान्य

छत्रपती संभाजीनगर : शहरात येणाऱ्या पर्यटकांना विविध पर्यटन स्थळ पाहता यावेत, यादृष्टीने महापालिकेने दोन डबल डेकर बस घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला. एप्रिलमध्ये या बस शहरात दाखल होणार आहेत. त्यासाठी मंगळवारी महापालिकेत विविध शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत तयारीसाठी आढावा बैठक घेण्यात आली.

शहरात दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात. पर्यटकांना पाहिजे तशा सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे महापालिकेने डबल डेकर बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. बस बांधणीचे काम सोलापूर येथील चव्हाण ऑटो व्हील कंपनीला दिले आहे. कंपनीने बसचे चेसिस, डिझाइन रेडी केले असून, बांधणीसाठी कर्नाटकमधील बॉडीबिल्डरला कामही दिले. बसच्या फिटनेस सर्टिफिकेटबाबतही आरटीओ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. दोन्ही बस शहरातील कोणकोणत्या मार्गाने धावतील यादृष्टीने आज एमटीडीसी, आयटीडीसी, गाइड असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सूचना मांडल्या. बसमध्ये स्थानिक कलावंतांचे सादरीकरण, बसमधील पर्यटकांना नाश्ता, जेवण देण्यासंदर्भातही सूचना करण्यात आल्या. ई-डबल डेकर बस १७ फूट उंच राहणार आहे. त्यामुळे मार्ग ठरविताना या बाबीचा विचार करावा लागणार आहे, मार्ग ठरल्यानंतर महावितरणला कळवून, रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या विजेच्या तारा हटविण्यात येतील. बसमध्ये ऑडिओ गाइडची सुविधा राहणार असून, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, जॅपनीज अशा ६ विदेशी भाषांमध्ये संबंधित पर्यटनस्थळांबाबत माहिती पर्यटकांना ऐकता येईल.

मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, शहर अभियंता ए. बी. देशमुख, मुख्य लेखा परीक्षक शिवाजी नाईकवाडे, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, विद्युत विभागाच्या मोहिनी गायकवाड, एमटीडीसीचे विजय जाधव, आयटीडीसीच्या स्नेहल पाटील, टुरिझम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जयवंतसिंग, एमएसईबीचे अधीक्षक अभियंता एम. बी. ठाकरे, चव्हाण ऑटो व्हील कंपनीचे शकील अहेमद आदींची उपस्थिती होती.

Web Title: Chhatrapati Sambhajinagar will have two double decker buses; Preference for tourist destinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.