‘इसिस’च्या संपर्कातील छत्रपती संभाजीनगरचा तरुण अटकेत; देशभरातील स्थळांची केली होती रेकी
By सुमित डोळे | Published: February 16, 2024 04:07 PM2024-02-16T16:07:36+5:302024-02-16T16:09:53+5:30
छत्रपती संभाजीनगरात नऊ ठिकाणी छापे; हर्सूलमधून तरुणाला अटक
छत्रपती संभाजीनगर : आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ‘इसिस’ने तरुणांची भरती करण्यासाठी शहरात पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपासात ही बाब निष्पन्न झाली. सात महिन्यांपासून शहरातील काही तरुणांवर एनआयए पाळत ठेवून होते. गुरुवारी पहाटेच दोन पथकांनी शहरात नऊ ठिकाणी छापे मारत हर्सूलच्या बेरीबाग परिसरातील गल्ली क्रमांक चारमधून मोहम्मद झोहेब खान (४०) याला अटक केली. मोहम्मद झोहेब गेल्या दोन वर्षांपासून इंटरनेटच्या माध्यमातून इसिसच्या आंतरराष्ट्रीय हस्तकांच्या संपर्कात आल्याचे सबळ पुरावे यंत्रणेच्या हाती लागले आहे.
गेल्या सात महिन्यांपासून एनआयए मोहम्मदवर पाळत ठेऊन हाेते. सोशल मीडियाद्वारे मोहम्मद झोहेब सातत्याने इसिसचा प्रचार करताना निष्पन्न झाला होता. त्यानंतर त्याच्यावर एनआयएच्या मुंबई विभागाने गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी पहाटेच दोन पथक शहरात दाखल झाले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना संपर्क करून मुख्यालयातील काही कर्मचाऱ्यांना सोबत घेत त्यांनी नऊ ठिकाणी छापे मारले. त्यानंतर शेवटी मोहम्मद झोहेबला दुपारी अटक केली. सोशल मीडियाद्वारे तो सहकाऱ्यांसह तरुणांना कट्टरवादाकडे वळवून इसिसमध्ये भरती करण्यासाठी उद्युक्त करत होते. या कारवाईमुळे मात्र शहर पोलिस दल, एटीएस विभाग खडबडून जागा झाला. रात्री उशिरापर्यंत अन्य तपास यंत्रणा झोहेबचे शहरातील मित्र, नातेवाइकांकडे चौकशी करत होते.
सोशल मीडियातून होते संपर्कात
एनआयएकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, झोहेब व त्याचे सहकारी मित्र गेल्या काही महिन्यांपासून देशभरातील इसिसच्या संपर्कात होतेच. त्याशिवाय, ते इसिस व विदेशातील दहशतवादी संघटनांच्या एजंटसोबत सातत्याने संपर्कात होते. त्यासाठी सोशल मीडियावरील विविध माध्यमांचा वापर करून ते कॉल, मेसेजवर उर्दू व इंग्रजी भाषेतून संवाद साधत होते.
लॅपटॉप, मोबाइल जप्त, इसिसचे पुस्तकेही आढळली
एनआयए च्या पथकाने झोहेबच्या घरात लॅपटॉप, मोबाइल जप्त केले. शिवाय, जिहाद, इसिस व कट्टरवादाचे पुस्तकेदेखील आढळून आले. सिरियाला स्थलांतर करण्याची माहिती असलेले कागदपत्रे देखील झोहेबकडे होते. पथकाने ते सर्व जप्त केले. इसिसची 'बायथ' म्हणजेच इसिसचा उद्देश सार्थ करण्यासाठी घेतलेल्या शपथेचा व्हिडिओदेखील पथकाला मिळून आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
कट रचणे सुरू होते, महत्त्वाचे स्थळ लक्ष
सिरियाला जाण्यासोबतच दहशतवादाकडे वळालेला झोहेब व त्याच्या मित्रांकडून देशातील काही महत्त्वाच्या स्थळ, इमारतींना व ऐतिहासिक स्थळांना लक्ष केले जाणार होते. त्या अनुषंगाने त्यांचा अन्य राज्यातील इसिस समर्थकांसोबत कट रचणे सुरू होते.