छ. संभाजीनगर जिपचे मुख्य कार्यकारी विकास मीना यांची यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदी बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 16:42 IST2025-03-11T16:42:04+5:302025-03-11T16:42:35+5:30

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विकास मीना हे ३० सप्टेंबर २०२२ रोजी रुजू झाले होते. 

Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad Chief Executive Vikas Meena transferred as Yavatmal District Collector | छ. संभाजीनगर जिपचे मुख्य कार्यकारी विकास मीना यांची यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदी बदली

छ. संभाजीनगर जिपचे मुख्य कार्यकारी विकास मीना यांची यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदी बदली

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांची यवतमाळच्या जिल्हाधिकारी पदावर बदली झाली आहे. सोमवारी सायंकाळी यासंबंधीचा आदेश प्राप्त झाला. ते आज, मंगळवारी यवतमाळ जिल्हाधिकारी पदाची सूत्रे घेणार आहेत. दरम्यान, त्यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागेवर कोण येणार, याबद्दल अद्याप निर्णय झालेला नसून विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी सक्षम अधिकाऱ्याकडे ‘सीईओ’चा तात्पुरता पदभार द्यावा, अशा शासनाच्या सूचना आहेत. छत्रपती संभाजीनगरजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विकास मीना हे ३० सप्टेंबर २०२२ रोजी रुजू झाले होते. 

जवळपास अडीच वर्षांच्या कार्यकाळात मीना यांनी जिल्हा परिषदेत विकासकामांना गती दिली. त्यांच्याच काळात चार मजली मुख्य प्रशासकीय इमारतीचे काम गतीने झाले. यासाठी त्यांनी वाढीव निधीची मागणी शासनाकडे लावून धरली. मात्र, ग्रामविकास सचिवांनी कोणत्याही जिल्हा परिषद इमारतीला वाढीव निधी देणार नसल्याची भूमिका घेतल्यामुळे मीना यांनी उपकरातून सहा कोटी निधी खर्च करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागात तरुणांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी म्हणून ५३ गावांत सुसज्ज ग्रंथालये, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत, ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक वर्षांपासून रखडलेल्या मोमबत्ता तलावात नौकाविहाराचा प्रश्न निकाली काढला. त्यांनी जि. प. शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी वाचन, लिखाण आणि गणितीय गुंता सोडविण्यासाठी ‘ॲप’ विकसित केले. कर्मचारी- अधिकाऱ्यांच्या हजेरीसाठी ‘ग्रामीण’ ॲप सुरू केले. शांत- संयमी असलेल्या विकास मीना यांची प्रशासनावर पकड असल्यामुळे प्रशासकीय कारभारातही मोठी सुधारणा झाली.

ग्रामीण भागात विकासकामे केले
मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासक म्हणून रुजू झाल्यानंतर ग्रामीण भागात विकासकामे करण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून मराठवाड्यात पहिल्यांदाच काम करण्याची संधी मिळाली. इथले लोक आणि इथली संस्कृती फार चांगली वाटली. पंतप्रधान आवास योजना, लाडकी बहीण योजना, तसेच राज्यात सर्वाधिक ‘मनरेगा’मध्ये कामे केली. सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांचेही चांगले सहकार्य मिळाले.
- विकास मीना, ‘सीईओ’, जि. प.

Web Title: Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad Chief Executive Vikas Meena transferred as Yavatmal District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.