छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांना दिली पदोन्नतीची दिवाळी भेट
By विजय सरवदे | Published: November 10, 2023 05:51 PM2023-11-10T17:51:57+5:302023-11-10T17:52:50+5:30
आदेश निर्गमित : कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद प्रशासनाने दिवाळीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी सामान्य प्रशासन व आरोग्य विभागातील ५९ कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी तीन दिवस अगोदरच कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी भेट देणार असल्याची घोषणा केली होती.
सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे यांनी सायंकाळी संबंधित ५९ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषद परिसरात कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे सचिव प्रदीप राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यामध्ये सामान्य प्रशासन विभागातील ३ कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांना सहायक प्रशासन अधिकारी या पदावर पदोन्नती मिळाली. ६ वरिष्ठ सहायकांना (लिपीक) कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावर, १७ कनिष्ठ सहायकांना (लिपीक) वरिष्ठ सहायक (लिपीक) या पदावर पदोन्नती देण्यात आली. याशिवाय आरोग्य विभागातील ५ आरोग्य सहायकांना आरोग्य पर्यवेक्षक पदावर, २० आरोग्य सेवकांना आरोग्य सहायक (पुरुष) या पदावर, तर २८ आरोग्यसेवक (महिला) यांना आरोग्य सहायक या पदावर पदोन्नती देण्यात आली.
आश्वासित योजनेचा लाभ प्रतीक्षेत
जिल्हा परिषदेचे सुमारे २५० कर्मचारी आश्वासित प्रगती योजनेचा (१० वर्षे, २० वर्षे, ३० वर्षे) लाभ मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाने सर्व विभागांना आवाहन केले आहे की, पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यासाठी त्यांचे प्रस्ताव अद्ययावत करावेत. या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीनंतर हे प्रस्तावही निकाली काढले जाणार आहेत.