छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या दोन संवर्गांच्या दोन पदांचा निकाल जाहीर
By विजय सरवदे | Published: January 29, 2024 01:26 PM2024-01-29T13:26:07+5:302024-01-29T13:26:54+5:30
गुणवत्ता यादी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या विविध १६ संवर्गांच्या ४३२ पदांसाठी ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने परीक्षा झाल्या. या परीक्षांचे निकाल आता हळूहळू समोर येत आहेत. विशेष म्हणजे, अन्य जिल्हा परिषदांच्या ५-५ संवर्गांसाठी झालेल्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. मात्र, छत्रपती संभाजीनगर जि. प.च्या आतापर्यंत अवघ्या दोनच संवर्गांचे निकाल जाहीर झाले असून, गुणवत्ता यादी जि. प.च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जि. प.च्या मेगा भरतीसाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये ‘आयबीपीएस’ कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात आल्या. लेखा विभागातील वरिष्ठ लिपिकाच्या एका पदासाठी, तर कृषी विभागाच्या विस्तार अधिकारी या एकाच रिक्त पदासाठी परीक्षा झाली होती. या दोन्ही संवर्गांचे निकाल जाहीर झाले असून, संकेतस्थळावर गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, ११ संवर्गांच्या १०४ जागांसाठी परीक्षा झाल्या होत्या. त्यापैकी आतापर्यंत २ संवर्गांच्या निकालाची गुणवत्ता यादी जि. प.कडे प्राप्त झाली असून, उर्वरित ९ संवर्गांच्या निकालाची प्रतीक्षा आहे, तर पाच संवर्गांच्या ३३० पदांसाठी आणखी परीक्षाच झालेल्या नाहीत. त्यामुळे परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे निकालाकडे आणि ५ संवर्गांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे परीक्षेकडे लक्ष लागलेले आहे. आता निकाल जाहीर झाले असून, निवड समितीच्या मान्यतेने कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वाधिक गुणवत्ता व परिपूर्ण कागदपत्रांच्या आधारे संबंधित उमेदवारास नियुक्तीपत्र दिले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणाच्या भूलथापांना अथवा अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.
पाच संवर्गांच्या परीक्षांची प्रतीक्षा
आरोग्यसेवकांच्या (पुरुष) ५ जागा, आरोग्यसेवक (महिला) २४४ जागा, आरोग्यसेवक (हंगामी फवारणी) ५७, कंत्राटी ग्रामसेवक १५ जागा व आरोग्य पर्यवेक्षिका ९, अशा एकूण या पाच संवर्गांच्या ३३० परीक्षा अद्यापही झालेल्या नाहीत.