आयुष्य हे चुलीवरल्या कढईतील कांदेपोहे; छत्रपती संभाजीनगरकर महिन्यात खातात १०० टन पोहे
By प्रशांत तेलवाडकर | Published: July 8, 2024 01:00 PM2024-07-08T13:00:33+5:302024-07-08T13:01:21+5:30
नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होताच कच्च्या कांदेपोह्यांची विक्री २० टक्क्यांनी वाढली.
छत्रपती संभाजीनगर : ‘भिजलेल्या क्षणांना आठवणीची फोडणी...आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे’ हे ‘सनई चाैघडे’ या चित्रपटातील गाणे लोकप्रिय ठरले होते...कांदेपोहे म्हटले की, स्थळ पाहण्यासाठी आलेला मुलगा व त्याच्या आई-वडिलांसाठी मुलगी ‘कांदेपोहे’ घेऊन येते. हा पारंपरिक प्रसंग नेहमीचाच. पण एरव्हीही नाश्त्याचा तो एक लोकप्रिय पदार्थ आहे. शहरात महिन्याकाठी १५० टन कच्चे पोहे विकले जातात. त्यात सर्वाधिक १०० टन एवढा हिस्सा कांदापोह्यांचा असतो.
२० टक्क्यांनी वाढली पोह्यांची विक्री
नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होताच कच्च्या कांदेपोह्यांची विक्री २० टक्क्यांनी वाढली. कारण, विद्यार्थ्यांना डब्यात कांदा पोहे दिले जातात. महाविद्यालय, क्लासेस, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सकाळचा नाश्ता गरमागरम कांदेपोहे ठरलेला असतो. यामुळे जूनमध्ये २० टक्क्यांनी पोह्यांचे विक्री वाढते.
कच्च्या पोह्यांचे प्रकार व किंमत
पोह्यांचे प्रकार किंमत (प्रति किलो)
कांदा पोहा --- ६० रु. पातळ पोहा--- ७० रु. मध्यम पोहा---५५ रु. टिकली पोहा---६० रु. भाजका पोहा---७० रु. शिक्का पोहा--- ७० रु. दगडी पोहा--- ४५ रु. ------
शहरात कुठून येतात कच्चे पोहे?
गुजरात येथील नवसारी, मध्य प्रदेशातील इंदोर, उज्जेैन, बालाघाट व छत्तीसगड येथील राजनंदगाव, बाटापारा अशा तीन राज्यांतून कच्च्या पोह्यांची आवक होते.
टिकली, शिक्का पोहा
टिकली पोहा, शिक्का पोहा असाही पोहा असू शकतो याची अनेकांना माहिती नाही. पण, हे प्रकार तळण्याचे आहेत. शहरात कांदा पोहा, भाजका पोहा, मध्यम व पातळ पोहा जास्त विकतात.
भेळभत्त्यासाठी भाजका पोहा
खास ‘भेळभत्ता’ खाण्यासाठी ग्राहक ग्रामीण भागात किंवा आठवडी बाजारात येत असतात. यासाठी भाजका पोहा वापरला जातो. या पोह्याला तळण्याची गरज नाही. नुसती फोडणी दिली की झाले.
दर महिन्याला किती टन पोहे खातात शहरवासीय ?
शहरात होलसेल विक्रेत्यांकडे १५ ते १६ ट्रक भरून कच्चेपोहे आणले जातात. महिन्याभरात सर्व प्रकारचे १५० टन पोहे विकले जातात. त्यातील १०० टन कांदा पोहे विकले जातात. होलसेलमध्ये ५० ते ६० लाखांची उलाढाल होते. किरकोळ विक्रेते या पोह्यांना खमंग फोडणी देऊन विकतात, घरोघरी नाश्त्याला पोहे बनतात.
- उमेश लड्डा, पोह्यांचे व्यापारी