छत्रपती संभाजीनगरकरांनी घेतला १८५ प्रकारच्या फ्लेव्हरसह १०० कोटींच्या आइस्क्रीमचा आस्वाद
By प्रशांत तेलवाडकर | Published: June 13, 2024 05:13 PM2024-06-13T17:13:10+5:302024-06-13T17:13:43+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ‘फेब्रुवारी ते मे’ या हंगामात जिल्ह्यात ३० टक्क्यांनी आइस्क्रीमची विक्री वाढली आहे.
छत्रपती संभाजीनगर : ‘आइस्क्रीम खाऊंगी, कश्मीर जाऊंगी, शोलो में भडके जिया’ हे २०१४ मधील ‘द एक्स्पोज’ चित्रपटातील गाणे गाजले होते... तसेच ‘साथ मेरे आओगी आइस्क्रीम खाओगी’ हे १९८३ मधील ‘जस्टीस चौधरी’ चित्रपटातील गाणे लोकप्रिय बनले होते. एवढेच नव्हे तर ‘टिंगू मिंगू गेले होते आइस्क्रीमच्या वनात, बटरस्कॉचची झाडे होती व्हॅनिलाच्या रानात’ हे बडबड गीतही बच्चे कंपनीच्या तोंडी होते... या गाण्यांचा उल्लेख करण्याचे कारण की, या उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरवासीयांनी चक्क १०० कोटींच्या आइस्क्रीमचा आस्वाद घेतला. ही आकडेवारी खुद्द आइस्क्रीम उत्पादक संघटनेने दिली.
शहरातील उच्चांकी तापमान नोंदले ४३ अंश
१९७२ च्या दुष्काळापासून ते आजपर्यंत सर्वाधिक उष्ण उन्हाळा यंदाचा ठरला. पहिल्यांदाच शहराचे तापमान ४३ अंशांपर्यंत जाऊन पोहोचले होते. उन्हाळ्यात मनाला व शरीराला थंडावा देणाऱ्या आइस्क्रीमची यंदा सर्वाधिक उलाढाल झाली.
३० टक्क्यांनी वाढली विक्री
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ‘फेब्रुवारी ते मे’ या हंगामात जिल्ह्यात ३० टक्क्यांनी आइस्क्रीमची विक्री वाढली आहे. चार महिन्यांत १०० कोटींची उलाढाल आइस्क्रीममध्ये झाली. शहरात ८ ते १० मोठ्या आइस्क्रीम उत्पादक कंपन्या आहेत. वाळूज औद्योगिक वसाहत, चिकलठाणा व नारेगाव येथे या कंपन्या आहेत.
- अनिल पाटोदी, अध्यक्ष, आइस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन
जिल्ह्यातील आइस्क्रीमची विक्री
वर्ष उलाढाल
२०२२ ६५ कोटी
२०२३ ७५ कोटी
२०२४ १०० कोटी
१८५ प्रकारचे फ्लेव्हर
आइस्क्रीममध्ये आता फ्लेव्हरला जास्त मागणी आहे. यंदा १८५ फ्लेव्हरमध्ये आइस्क्रीम उपलब्ध झाले. यात फळांचा स्वाद, फुलांच्या स्वादातील आइस्क्रीमला मागणी जास्त होती. यात आइस्क्रीमसोबत कोन व कुल्फीलाही आबालवृद्धांची पसंती मिळाली.