किराडपुरा जाळपोळ: आरोपींच्या शोधार्थ तब्बल २२ पथके; आतापर्यंत ४६ जणांना अटक
By राम शिनगारे | Published: April 4, 2023 07:59 PM2023-04-04T19:59:37+5:302023-04-04T19:59:54+5:30
नागरिकांकडे व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेज असल्यास देण्याचे पोलिसांचे आवाहन; सहभागी आरोपींची धरपकड सुरु
छत्रपती संभाजीनगर : किराडपुऱ्यातील राममंदिर परिसरातील दगडफेक, जाळपोळ प्रकरणात आरोपींची धरपकड सुरू आहे. त्यासाठी तब्बल २२ पथके नेमण्यात आली असून, प्रत्येक पोलिस ठाण्यातील एकापेक्षा अधिक पथकांना कामाला लावले आहे. आतापर्यंत ४६ आरोपींना अटक केली आहे. यातील तीन अल्पवयीन आहेत. आणखी ३८ जणांची ओळख पटली असून, त्यांनी घर सोडून पळ काढला आहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिली.
गुप्ता यांनी जिन्सी पोलिस ठाण्यात या पथकांच्या कामगिरीचा आढावा घेतला. बैठकीनंतर ‘लोकमत’शी बोलताना आयुक्त म्हणाले, अटक केलेले आरोपी, त्यांची केस डायरी, संबंधितांच्या विरोधातील सज्जड पुरावे जमविण्यात येत आहेत. पुराव्याशिवाय कोणालाही अटक केलेली नाही. जाळपोळीतील सहभाग असल्यानंतर अटक केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत ४६ जणांना अटक केली आहे. त्यातील तीनजण अल्पवयीन आहेत. आरोपींच्या शोधासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यातील एक पथक आणि गुन्हे शाखेची पाच पथके कार्यरत आहेत. यावेळी पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, एसआयटीचे प्रमुख निरीक्षक संभाजी पवार, सायबरच्या निरीक्षक प्रवीणा यादव, जिन्सीचे निरीक्षक अशोक भंडारे यांच्यासह १०० पेक्षा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डीसीपींच्या सूचना
२२ पथकांतील पोलिस अधिकारी, कर्मचारी, सायबर ठाण्यातील अधिकाऱ्यांना आरोपींची धरपकड करण्याविषयीच्या सूचना पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी दिल्या. त्याचवेळी आरोपींना पकडण्यासाठी जाताना कोणत्या पद्धतीने कार्यवाही करावी, त्याविषयीची माहिती पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली.
नागरिकांकडे व्हिडिओ असतील तर द्यावे
किराडपुरा जाळपोळ प्रकरणातील नागरिकांकडे काही व्हिडीओ, सीसीटीव्ही फुटेज असतील तर त्यांनी पोलिसांना तपासासाठी द्यावे, व्हिडीओ फुटेज देणाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. त्यांची नावेही पोलिस गोपनीय ठेवतील. जाळपोळ प्रकरणात सहभागी असलेल्यांची ओळख पटवूनच संबंधितांना ताब्यात घेतले जात आहे. त्यासाठी पोलिस अविरतपणे प्रयत्न करीत आहेत.
- डॉ. निखिल गुप्ता, पोलिस आयुक्त