छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा; क्वीक सर्व्हेच्या आडून भाजपने वाढविला शिंदेसेनेवर दबाव
By विकास राऊत | Published: April 8, 2024 11:47 AM2024-04-08T11:47:09+5:302024-04-08T11:47:53+5:30
गुढीपाडवा महायुतीत कुणासाठी ठरणार गोड, याकडे लक्ष
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. या जागेवर शिंदेगट लढणार, हे जवळपास स्पष्ट असताना क्वीक सर्व्हेच्या आडून भाजपने शिंदेसेनेवर दबाव वाढविला आहे. या सर्व्हेच्या आधारे औरंगाबाद, नाशिक आणि रत्नागिरी मतदारसंघाचा निर्णय होईल, अशी अपेक्षा भाजपला आहे.
दोन दिवसांपूर्वीच्या बैठकीनंतर औरंगाबाद मतदारसंघ शिंदेसेनेला सुटणार, हे जवळपास निश्चित झाले होते. पालकमंत्री संदिपान भुमरे हेच लढणार, असा निरोप कार्यकर्त्यांपर्यंत गेला आहे. शिंदेसेनेने प्रचार कार्यालयाची देखील तयारी सुरू केली असून, भाजपच्या स्थानिक मंत्र्यांना, नेत्यांना भुमरे यांना चहापानाला पहिल्यांदाच बोलाविले होते. त्या चर्चेत उमेदवार कुणी असो, महायुती म्हणून सहकार्य करण्याचे आवाहन भुमरे यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला केले. या सगळ्या घडामोडीनंतर भाजप नेते अस्वस्थ झाले, त्यांनी वरिष्ठांकडे जागा भाजपला सुटावी, अशी मागणी केली. त्यानंतर भाजपने क्वीक सर्व्हे (तातडीची पाहणी) केला. सर्व्हेमध्ये शिंदेसेनेकडील इच्छुक आणि भाजपातील इच्छुकांच्या नावानुसार सामाजिक, राजकीय, शैक्षणिक प्रश्न विचारण्यात आल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.
भाजपातील इच्छुकांना ‘क्वीक सर्व्हे’ एवढी एकच शेवटची अपेक्षा असून, त्यावरच त्यांची मदार आहे. मराठवाड्यातील सर्व जागांचे वाटप झाले आहे. फक्त औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ उमेदवार आणि पक्ष जाहीर होणे बाकी आहे. मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या जागेसह रत्नागिरी, नाशिक जागेचाही निर्णय होईल. पाडवा महायुतीत कुणाला गोड ठरेल, याकडे लक्ष लागले आहे. रविवारची रात्र आणि सोमवारचा पूर्ण दिवस महायुतीमध्ये बैठकीचे चर्चासत्र चालणार आहे. त्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार असल्यामुळे शिंदेसेनेने सध्या तरी सबुरीची भूमिका घेतली आहे.
पक्ष स्थापनेदिनी भाजपचे मंथन?
६ एप्रिल रोजी भाजपचा पक्षस्थापना दिन होता. कुलस्वामिनी मंगल कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मंथन झाले. या बैठकीत औरंगाबाद मतदारसंघ भाजपला सुटावा, यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नेत्यांना साकडे घातले. वरिष्ठांशी बोलू, मागणी करू, एवढाच शब्द नेते पदाधिकाऱ्यांना देऊ शकले.
क्वीक सर्व्हे काय सांगतो?
‘क्वीक सर्व्हे’मध्ये शिंदेसेना ११ टक्के, भाजप १५ टक्के, अपक्ष ९ टक्के असे विश्लेषण भाजप नेत्यांपर्यंत आले होते. याआधारे काय निर्णय होणार, याकडे लक्ष लागले आहे.