छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलिस आयुक्त मनोज लोहिया रुजू; लोकाभिमूख काम करण्याची ग्वाही
By राम शिनगारे | Published: April 27, 2023 04:32 PM2023-04-27T16:32:29+5:302023-04-27T16:35:07+5:30
नागरिक, व्यापारी, उद्योजकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य असणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहर पोलिस आयुक्त पदाचा पदभार मनोज लोहिया यांनी गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास स्विकारला. मावळते पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी हा पदभार त्यांच्याकडे सोपवला. यावेळी शहराचे तिन्ही पोलिस उपायुक्त उपस्थित होते.
राज्य शासनाने २४ एप्रिल रोजी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या बदलीचे आदेश काढले होते. त्यानुसार पिंपरी चिंचवडचे पोलिस सहआयुक्त मनोज लोहिया यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार डॉ. गुप्ता यांना शहर पोलिसांतर्फे बुधवारी सायंकाळीच त्यांना निरोप देण्यात आला होता. डॉ. गुप्ता यांचीही पोलिस महासंचालक कार्यालयातील प्रशासन विभागाच्या अपर पोलिस महासंचालकपदी नेमणूक झाली आहे. गुरूवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मनोज लोेहिया हे कुटुंबातील सदस्यांसह पोलिस आयुक्तलयात पोहचले. त्याठिकाणी उपस्थिित डॉ. निखिल गुप्ता यांनी त्यांच्याकडे पदभार सोपवला. नविन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, दिपक गिऱ्हे, शिलवंत नांदेडकर, सहायक पोलिस आयुक्त निशिकांत भुजबळ, आशोक थोरात, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सायबरच्या प्रविणा यादव आणि आयुक्तांच्या वाचक पोलिस निरीक्षक सुनीता मिसाळ यांची उपस्थिती होती.
लोकाभिमुख काम करणार : लोहिया
आजच पदभार स्विकारला आहे. लोकाभिमुख काम करण्याचा संकल्प केला आहे. नागरिक, व्यापारी, उद्योजकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य असणार आहे. त्याशिवाय कायदा व सुव्यवस्था कडक करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.