एकदम कडक: छत्रपती संभाजीनगरचा पारा @ ३७ ! उष्माघातापासून काळजी घ्या
By विकास राऊत | Published: April 6, 2023 02:45 PM2023-04-06T14:45:58+5:302023-04-06T14:50:52+5:30
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तापमान वाढण्यास सुरुवात झाली असून, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पारा चढला आहे.
छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान बुधवारी नाेंदविले गेले. पारा ३७.३ अंश सेल्सिअसवर गेला. सकाळपासूनच उन्हाळ्याचे चटके जाणवत होते. दुपारी एकदम कडक ऊन होते. सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत उन्हाचा कडाका कायम होता. चिकलठाणा वेधशाळेने यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद घेतली.
जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांत कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यान राहिले. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तापमान वाढण्यास सुरुवात झाली असून, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पारा चढला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी उष्माघातापासून काळजी घेण्याचे आवाहन करीत काही सूचना केल्या आहेत. दर अर्ध्या तासाने पुरेसे पाणी प्या, घराबाहेर पडताना छत्री, टोपीचा वापर करा, दुपारी १२ ते ३ घराबाहेर पडणे टाळा, हलकी, पातळ, सछिद्र कपडे वापरा. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवा. उन्हात काम करताना टोपी, छत्री, ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरची लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक, आदी नियमित सेवन करावे. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत घाम येणे, चक्कर येणे ही उन्हाचा झटका बसण्याची लक्षणे असून, तातडीने डॉक्टरांकडे जावे. उन्हात अतिकष्टाची कामे टाळावीत, जाड कपडे वापरणे टाळावे.
१ ते ५ एप्रिलचे तापमान असे...
१ एप्रिल : ३४.२ अंश सेल्सिअस
२ एप्रिल : ३५.० अंश सेल्सिअस
३ एप्रिल : ३५.४ अंश सेल्सिअस
४ एप्रिल : ३६.७ अंश सेल्सिअस
५ एप्रिल : ३७.२ अंश सेल्सिअस