असेही गाव, जेथे १०० वर्षांत ना कोणी घरासमोर मंडप उभारला ना लग्न लावले; रंजक आहे कारण
By प्रशांत तेलवाडकर | Published: May 20, 2023 03:31 PM2023-05-20T15:31:22+5:302023-05-20T15:38:33+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या गावात ‘नो बॅंड बाजा बराती’
छत्रपती संभाजीनगर : सर्वत्र लग्नसराईची धुमधाम सुरू आहे. गावागावातही भले मोठे मंडप टाकून धुमधडाक्यात लग्न पार पडत आहे. मात्र, पैठण तालुक्यातील ‘हिवरा चौंढाळा’ या गावात मात्र, मागील १०० वर्षांत कोणी घरासमोर मंडप उभारलेला किंवा लग्न लावलेले नाही. याचा अर्थ या गावात सर्व अविवाहित आहेत असे नाही. गावाच्या वेशीबाहेर जाऊन हनुमान मंदिराच्या साक्षीने लग्न लावले जातात. पण गावात कोणी लग्न लावण्याचे धाडस करीत नाही.
हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल... मात्र, हे तेवढेच सत्य आहे. छत्रपती संभाजीनगर शहराकडून ‘बीड’ कडे जाताना ७० कि.मी अंतरावर ‘हिवरा चोंढाळा’ हे गाव आहे. या गावात श्रीक्षेत्र माहूरच्यादेवीचे उपपीठ आहे. येथे दगडी चिरेबंदी वाडा असून मंदिरही संपूर्ण दगडात बनविले आहे. गाभाऱ्यात चार बाय चार फुटांचा देवीचा तांदळा (मुखवटा) आहे. पाषाणातील हा तांदळा शेंदूर रंगाचा व देवीचे डोळे मोठ्या आकारातील आहे. ही देवी अविवाहित आहे. यामुळे तिचा आदर करण्यासाठी किंवा तिचा कोप होऊ नये यासाठी गावकरी गावात लग्न लावत नाही, घरासमोर मंडप उभारत नाही. गावाच्या दीड ते दोन कि.मी. वेशीबाहेर लग्न लावतात. हे मंदिर सुमारे ५०० पेक्षा अधिक वर्षांचे आहे, असे येथील गावकऱ्यांनी सांगितले. पिढ्यानपिढ्या ही परंपरा जपली जात आहे.
बाळंतीणसुद्धा झोपते जमिनीवर
हिवरा चोंढाळातील देवीच्या मंदिरापेक्षा घराची उंची जास्त असू नये, यासाठी गावातील श्रीमंत असो वा गरीब कोणीही घरावर पहिला मजला बांधत नाही. सर्वजण तळमजल्यावरच राहतात. तसेच देवीची कोणी बरोबरी करू नये यासाठी सर्व जण जमिनीवर झोपतात. पलंगाचा वापर कोणी करीत नाही. बाळांतीणसुद्धा जमिनीवरच झोपते. आजपर्यंत मी कोणाला गावात लग्न लावताना पाहिले नाही.
- सत्यभामा करताडे, गावातील १०० वर्ष वयाच्या आजी
लग्न लावल्यावरच नवरदेव गावात पाऊल ठेवतो
गावातील तरुणीचे बाहेर गावातील तरुणाशी लग्न जुळले. तर लग्नाच्या दिवशी नवरदेव हिवरा चोंढाळा गावात पाऊल ठेवत नाही. थेट वेशीबाहेरील मंगल कार्यालयात वरात जाते. लग्न लागल्यानंतर नवरा-नवरी जोडीने गावात येतात व देवीचे दर्शन घेतात.
गावकऱ्यांची श्रद्धा
देवीला लग्न करायचे नव्हते, पण दैत्यराजाने बळजबरीने लग्नाचा प्रयत्न केला. त्यावेळीस देवीचा कोप झाला व दैत्यराजाने आणलेले वऱ्हाडी दगडात रूपांतर झाले म्हणून गावाच्या आसपास लहान-मोठे असंख्य दगड दिसतात, अशी कथा पूर्वजांनी सांगितली. यामुळे कोणी गावात लग्न लावत नाही. वेशीबाहेर लग्न करतात. गावात आज ७०० लोकसंख्या आहे. देवीचे मंदिर पुरातन आहे.
- कमलाकर वानोळे, पूजाअर्चा, देखभाल करणाऱ्या परिवाराचे ज्येष्ठ सदस्य