उड्डाणपुलावर जाणारे ‘डायव्हर्जन’ धोक्याचे? दुभाजकामध्ये खोदलेला खड्डा टँकर अपघाताला कारणीभूत?
By विकास राऊत | Published: February 2, 2024 06:18 PM2024-02-02T18:18:31+5:302024-02-02T18:20:53+5:30
Chhatrapatisambhajinagar Gas Leak: महापालिका जालना रोडवरील अपघाताच्या ‘स्पॉटचे ऑडिट’ करणार
छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील सिडको उड्डाणपुलावर जाण्यासाठी असलेले ‘डायव्हर्जन’ (वळण) धोक्याचे, त्यातच पुलाच्या ‘टेकऑफ मेन स्पाॅट’च्या लगत खोदलेल्या खड्ड्याच्या बाजूला काम प्रगतिपथावर असल्याचा बोर्ड पाहून गॅस टँकरचालकाला अंदाज आला नाही व तो पुलाच्या दुभाजकावर धडकल्याचे सकृतदर्शनी बोलले जात आहे.
अशा विचित्र त्रांगड्यामुळे गुरुवारी पहाटे झालेल्या अपघाताने जालना रोडवरील पुलांची सुरक्षितता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दरम्यान, जालना रोडवरील अपघाताच्या ‘स्पॉटचे ऑडिट’ करणार असून अपघाताच्या नेमक्या कारणांची चौकशी करण्यात येईल, असे महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले.
पुलाच्या ‘टेकऑफ मेन स्पाॅट’समोर कुठलेही रिफ्लेक्टर नाही. त्यामुळे तेथे पुलावर जाण्याचा रस्ता सरळ आहे की, तिथे अनव्हिसिबल वळण आहे, हे चालकाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे अपघात होण्याचा जास्त धोका आहे.
तो खड्डा कुणी खोदला?
जालना रोडसह शहरात फुटावर जाहिरात होर्डिंग्जसाठी ग्रॅण्टी लावण्यात येत आहेत. त्यामुळे दुभाजकाच्या मधोमध रातोरात दहा फूट खोल, तीन बाय तीन रुंदीचा खड्डा खोदण्यात येत आहे. या कामाला कोण परवानगी देते. या ग्रॅण्टी अधिकृत आहेत की अनधिकृत, याबाबत कुणीही बोलण्यास तयार नाही. दरम्यान, मनपा प्रशासकांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रोडचे ऑडिट करणार...
जालना रोडचे पूर्णत: ऑडिट केले जाईल. तसेच गुरुवारी पहाटे झालेला अपघात कशामुळे झाला, याची चौकशीदेखील करण्यात येईल. भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत, यासाठी उपाययोजना करावी लागेल.
-जी. श्रीकांत, मनपा प्रशासक