समजून घ्या, टँकर का धोकादायक झाला? कसे पर्याय शोधले गेले ? संपूर्ण घटनाक्रम एका क्लिकवर

By सुमित डोळे | Published: February 2, 2024 04:36 PM2024-02-02T16:36:38+5:302024-02-02T16:41:16+5:30

Chhatrapatisambhajinagar Gas Leak: या घटनेमुळे तब्बल ११ तास अर्ध्याअधिक शहराचा श्वास रोखला गेला.

Chhatrapatisambhajinagar Gas Leak: Understand why tanker became dangerous? How are alternatives explored? Complete schedule in one click | समजून घ्या, टँकर का धोकादायक झाला? कसे पर्याय शोधले गेले ? संपूर्ण घटनाक्रम एका क्लिकवर

समजून घ्या, टँकर का धोकादायक झाला? कसे पर्याय शोधले गेले ? संपूर्ण घटनाक्रम एका क्लिकवर

छत्रपती संभाजीनगर : १८ मेट्रिक टन गॅस क्षमता असलेला ‘एचपीसीएल’ कंपनीचा (क्र. एमएच- ४३. बीपी- ५९०२) टँकर बुधवारी रात्री चाकणवरून निघाला होता. गुरुवारी पहाटे चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील कंपनीच्या प्लांटमध्ये चालकाला टँकर पोहोचवायचा होता. सेव्हनहिल उड्डाणपूल उतरून तो सिडको चौकाच्या दिशेने जाताना मात्र टँकर अचानक सिडको उड्डाणपुलाच्या सुरुवातीच्या दुभाजकावर चढला. दुभाजकावर सजावटीसाठी उभारलेल्या शिल्पावर आदळून टँकरची केबिन तुटली व मागील बाजूस गॅस व्हॉल्व्ह बॉक्स तुटून गॅस गळती होण्यास सुरुवात झाली. या अपघाताने परिसरात मोठा आवाज झाला. हवेत वेगाने पसरलेल्या गॅसने आसपासच्या रहिवाशांना त्रास सुरू झाला. यामुळे अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. तब्बल ११ तास अर्ध्याअधिक शहराचा श्वास रोखला गेला. गॅस व लिक्विड काढल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने औद्योगिक वसाहतीमधील मोकळ्या मैदानावर टँकर हलविण्यात आले. सर्व यंत्रणांच्या अथक प्रयत्नांमुळे सायंकाळी ६:३० वाजता प्रशासनासह शहराने सुटकेचा नि:श्वास सोडला. या थरारक घटनेत टँकर का धोकादायक झाला? यातून बाहेर पडण्यासाठी कसे पर्याय शोधले गेले याची माहिती जाणून घेऊ.

सात कंपन्यांची धाव, बजाजने पुरवला ६ मीटर पाईप अन् कनेक्टर : 
- १८ मेट्रिक टन गॅसच्या टँकरमध्ये तळाला द्रव स्वरूपात (लिक्विड) भरलेला गॅस असतो, तर वरच्या भागात वाफेच्या स्वरूपात गॅस उपलब्ध असतो.
- या टँकरला प्रत्येकी २ इंचांचे ३ वॉल होते. अपघात होताच गाडीच्या केबिनपासूनचा पहिला ‘व्हेपर वॉल’ पूर्णपणे तुटला. दुसरा वॉल बेंड झाला, तर तिसऱ्या वॉलचे सुरक्षेचे आवरण तुटून पडले होते.
- त्यातूनच गॅस बाहेर येण्यास सुरुवात झाली. टँकरमध्ये द्रव स्वरूपात किती गॅस आहे, हे सांगणारा रोटोगेजही तुटला.
- मदतीसाठी धावलेल्या औद्योगिक कंपन्यातील तज्ज्ञांनी हाय प्रेशर होज पाईपद्वारे गॅस ट्रान्सफर करण्याचे ठरवले. मात्र, त्यासाठी आवश्यक पाईपच जिल्ह्यात उपलब्ध नव्हता. मार्ग संस्थेच्या अमित दगडे यांनी ५ ते ६ कारखान्यांना संपर्क साधला. केवळ बजाज ऑटो कंपनीकडेच ३ मीटर पाईप उपलब्ध होता. मात्र, तेवढा पुरेसा नव्हता. कंपनीने पुन्हा आणखी ३ मीटरचा पाईप उपलब्ध करून दिला.
- पाईप जोडण्यासाठी आवश्यक कनेक्टरच नसल्याचे कळाले. बजाजने त्यांच्या दोन तज्ज्ञांसह कनेक्टर देखील उपलब्ध करून दिले.
- तोपर्यंत जळगाववरून भारत पेट्रोलियमची ‘रिस्क्यू टीम’ निघाली होती.

मागचा ड्रेन वॉल उघडला
अखेर दुपारी १ वाजता पाईप जोडण्यात आले. पाण्याचा मारा वाढवण्यात आला. गॅस ट्रान्सफर सुरू झाला. वॉलची क्षमता वाढवताना मात्र, अडचण आली. रोटोगेज तुटल्याने गॅस किती आहे, हे समजण्यात अडचणी येत होत्या.
- कंपनीच्या अधिकाऱ्यांनी टँकरचा मागील ड्रेन वॉल उघडण्याचे ठरवले. तो ओपन केल्यानंतर पुढील ५ मिनिटात टँकर खाली झाला.

‘मार्ग’ने काढला महत्त्वपूर्ण मार्ग
- सकाळी ६ वाजता औद्योगिक सुरक्षा संचालनालयाला घटनेची माहिती देण्यात आली. त्यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या ‘मार्ग’ (म्युच्युअल एड रिस्पॉन्स ग्रुप) संस्थेचे प्रमुख अमित दगडे यांना संपर्क केला. दगडे यांनी जवळपास ८ कंपन्यांच्या आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञांना संपर्क करून ते घटनास्थळी दाखल झाले. दगडे यांच्यासह ग्रिव्हज् कॉटन प्रा. लि. चे अनिल पवार, विजय सोनवणे, गजानन वाघ, महेश राऊत, स्टरलाईट टेक्नॉलॉजिसचे सुदर्शन सांगळे, सतीश सांगळे, वोखार्ड प्रा. लि.चे अनिल नलावडे, बजाज ऑटो प्रा. लि.चे एस. एम. बिराजदार, श्याम सुंदर, औद्योगिक सुरक्षेचे महेश भालेकर, लिंडे इंडिया प्रा. लि.चे धीरज खिरोडकर, प्रशांत खिरोडकर यांचा मदत मोहिमेत महत्त्वपूर्ण सहभाग राहिला.

वाहतुकीचा खोळंबा अन् ग्रीन कॉरिडॉर
सायंकाळी ६ वाजता तज्ज्ञांनी अनुमती दिल्यानंतर टँकर हलविण्याचा निर्णय झाला. तो हलविण्यासाठी एकूण ५ क्रेन मागविण्यात आल्या. त्यापैकी दोन क्रेनच्या साहाय्याने टँकर उचलण्यात आला. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील एचपीसीएल कंपनीच्या जवळील मोकळ्या मैदानावर तो ठेवण्याचा निर्णय झाला. तेथे नेण्यासाठी पोलिसांच्या कॅनव्हायमध्ये ग्रीन कॉरिडॉर करून टँकर सुरक्षित पोहोचविण्यात आला. तेथेदेखील कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा टँकरची तपासणी केली.

जालना रोडवर शुकशुकाट; इतर रस्त्यांवर वाहतुकीचा खोळंबा
- पहाटेच्या घटनेनंतर प्रशासनाने सोशल मीडिया, व्हॉट्सॲपद्वारे नागरिकांपर्यंत घटनेची माहिती पोहोचविली. त्यात प्रामुख्याने जालना रस्त्यावर येणे टाळण्याचा उल्लेख असल्याने लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच जालना रोडवर गुरुवारी दिवसभर शुकशुकाट पाहायला मिळाला.
- पोलिसांनी सिडको चौक ते सेव्हनहिल मार्ग पूर्णपणे बंद केला होता. त्यामुळे वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली.
- परिणामी, सर्व भार सेंट्रल नाका, चिश्तिया चौक, कॅनॉट प्लेस तर दुसऱ्या बाजूला गजानन महाराज मंदिर रोड, पुंडलिकनगर, कामगार चौक व सिडको चाैकावर आला. अचानक अंतर्गत रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या. चौकाचौकांत पोलिस उभे करण्यात आले. मात्र, कार्यालयीन वेळेत लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

६ ते १० मिनिटांचा रिस्पॉन्स टाइम
मॉर्निंग राऊंडवर आम्ही धार्मिक स्थळांची पाहणी करत होतो. धूत रुग्णालयाजवळ उभे असताना महिला कारचालकाने थांबून आम्हाला अपघाताची माहिती दिली. गाेल आकाराचे टँकर असल्याचे तिने सांगितले. पहिले सिमेंट मिस्कर असल्याचे वाटले. आम्ही तत्काळ धाव घेतली. पहाटे देखील बघ्यांची माेठी गर्दी होती. चालकाला स्थानिकांनी रुग्णालयात पाठवले होते. मात्र, टँकरजवळ उभे राहणे कठीण होते. गॅसगळतीचा मोठा आवाज येत होता. श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. तेव्हाच घटना गंभीर स्वरुप धारण करेल, हे लक्षात आले आणि वरिष्ठांना कळवण्यात आले.
- अमोल सातोदकर, सहायक निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.

तोंडात बिडी ठेवून गॅसगळती पाहात होता रिक्षाचालक
आम्ही टीव्ही सेंटर चौकात रात्र गस्तीवर होतो. पहाटे ५.२५ वाजता आम्हाला नियंत्रण कक्षाकडून अपघाताची माहिती समजली. आम्ही ५.३५ वाजेपर्यंत तिकडे धाव घेतली. मोठा आवाज सुरू होता. सर्वत्र गॅसचा वास पसरण्यास सुरुवात झाली. तेवढ्यात एक रिक्षाचालक हातात बीडी घेऊन पाहत होता. लोकांनी ते पाहताच एकच धावपळ उडाली. काय झाले, हे कळेपर्यंत रिक्षाचालक टँकरकडे तोंडात बिडी ठेवून पाहत होता. आमच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या दिशेने धाव घेत बिडी विझवून त्याला लांब केले. त्यानंतर गर्दी पांगवण्यात आली. तेव्हाच सिडको अग्निशमन विभागाचे जवानांनी सर्वप्रथम धाव घेतली.
- पंकज मोरे, उपनिरीक्षक, सिडको पोलिस ठाणे.

रासायनिक वाहनांच्या वाहतुकीविषयी विचार होणार
शहरात पेट्रोल, डिझेलसह अन्य औद्योगिक रसायनांची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गुरुवारी दुपारी आम्हाला काही संघटना, संस्था व व्यापाऱ्यांकडून याविषयी सूचना प्राप्त झाल्या. त्याचा निश्चितपणे गांभीर्याने विचार करू. मनपा, वाहतूक विभाग व संबंधित घटकांशी आधी सविस्तर चर्चा केली जाईल. अवजड वाहने, रसायनांची वाहतूक करणाऱ्या वाहनांविषयी निश्चित विचार करुन निर्णय घेऊ.
- मनोज लोहिया, पोलिस आयुक्त.

गॅस टँकर घटनाक्रम :
पहाटे ५.१३ - गॅस टँकर पुलाच्या दुभाजकाला जाऊन धडकला.
५.१८ वाजता मनपाच्या नियंत्रण कक्षाला काॅल प्राप्त.
५.३५ - पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
५.४० - सिडको अग्निशमन बंबासह जवानांनी दाखल होत पाण्याचा मारा सुरू केला.
६.०० - नियंत्रण कक्षाद्वारे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दाखल होण्याच्या सूचना. रस्ता बंद करून परिस्थिती नियंत्रणात घेतली.
६.३० - पाण्याचे टँकरची संख्या वाढवण्यात आली.
७.०० - ट्युशन क्लास, हॉस्टेल रिकामे करण्याच्या सूचना. गॅस न पेटवण्यासाठी पोलिस व्हॅनद्वारे घाेषणा सुरू.
८ ते ९ - मनपाचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस अधिकारी घटनास्थळी धाव घेतली. परिसराला छावणीचे स्वरुप.
९.०० - आसपासच्या नागरिकांना घरे रिकामे करण्यास सांगितले.
१०.०० - मनपा प्रशासक जी. श्रीकांत, पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी तज्ज्ञांशी चर्चा सुरू केली.
१२.०० - अपघातग्रस्त गॅस टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्याचा निर्णय.
३.३० - गॅस यशस्वीरीत्या ट्रान्सफर करण्यात आला.
६.०० - अंतिम पाहणी करून टँकर चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये हलवण्यात आला.
६.३० - जालना रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करून व्यावसायिकांना दुकाने, कार्यालय, हॉटेल उघडण्यास अनुमती देण्यात आली.

Web Title: Chhatrapatisambhajinagar Gas Leak: Understand why tanker became dangerous? How are alternatives explored? Complete schedule in one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.