फर्स्ट इन्फॉर्मेशननंतर ६ मिनिटांचा रिस्पॉन्स टाइम, टँकरवर १० लाख लिटर पाण्याचा केला मारा

By सुमित डोळे | Published: February 2, 2024 04:19 PM2024-02-02T16:19:02+5:302024-02-02T16:21:06+5:30

Chhatrapatisambhajinagar Gas Leak: शहराचा श्वास रोखला! अठरा मेट्रिक टन गॅस घेऊन जाणारा ‘एचपीसीएल’ टँकरचा भीषण अपघात, टँकरचे दोन व्हॉल्व्ह फुटून ५ टन गॅस हवेत

Chhatrapatisambhajinagar Gas Leak:Response time of 6 minutes after first information, 1 million liters of water hit the tanker | फर्स्ट इन्फॉर्मेशननंतर ६ मिनिटांचा रिस्पॉन्स टाइम, टँकरवर १० लाख लिटर पाण्याचा केला मारा

फर्स्ट इन्फॉर्मेशननंतर ६ मिनिटांचा रिस्पॉन्स टाइम, टँकरवर १० लाख लिटर पाण्याचा केला मारा

छत्रपती संभाजीनगर : पुण्याजवळील चाकणवरून अठरा मेट्रिक टन गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकरचा शहरात भीषण अपघात झाला. गुरुवारी पहाटे ५:१३ वाजता वसंतराव नाईक महाविद्यालयासमोरील सिडको उड्डाणपुलाच्या दुभाजकाला तो धडकला. यात टँकरच्या तीन मुख्य नोझल व्हॉल्व्हपैकी २ व्हॉल्व्ह तुटल्याने मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली. परिणामी, मोठा आवाज होऊन परिसरात गॅस पसरण्यास सुरुवात झाली. यामुळे अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. तब्बल ११ तास अर्ध्याअधिक शहराचा श्वास रोखला गेला. गॅस व लिक्विड काढल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने औद्योगिक वसाहतीमधील मोकळ्या मैदानावर टँकर हलविण्यात आले. सर्व यंत्रणांच्या अथक प्रयत्नांमुळे सायंकाळी ६:३० वाजता प्रशासनासह शहराने सुटकेचा नि:श्वास सोडला.

१८ मेट्रिक टन गॅस क्षमता असलेला ‘एचपीसीएल’ कंपनीचा (क्र. एमएच- ४३. बीपी- ५९०२) टँकर बुधवारी रात्री चाकणवरून निघाला होता. गुरुवारी पहाटे चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील कंपनीच्या प्लांटमध्ये चालकाला टँकर पोहोचवायचा होता. सेव्हनहिल उड्डाणपूल उतरून तो सिडको चौकाच्या दिशेने जाताना मात्र टँकर अचानक सिडको उड्डाणपुलाच्या सुरुवातीच्या दुभाजकावर चढला. दुभाजकावर सजावटीसाठी उभारलेल्या शिल्पावर आदळून टँकरची केबिन तुटली व मागील बाजूस गॅस व्हॉल्व्ह बॉक्स तुटून गॅस गळती होण्यास सुरुवात झाली. या अपघाताने परिसरात मोठा आवाज झाला. हवेत वेगाने पसरलेल्या गॅसने आसपासच्या रहिवाशांना त्रास सुरू झाला. घटनेची माहिती कळताच रात्रगस्तीवर असलेले सहायक निरीक्षक अमोल सातोदकर, उपनिरीक्षक पंकज मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

‘त्या’ महिलेमुळे पोलिस सतर्क; ६ मिनिटांचा राहिला रिस्पॉन्स टाइम
अपघात पाहिलेल्या एका महिला कारचालकाने धूत रुग्णालयाजवळ रात्रगस्तीवर असलेल्या सातोदकर यांना घटनेची माहिती दिली. सातोदकर तत्काळ रवाना झाले. तोपर्यंत उपनिरीक्षक मोरे, ११२ चे दोन कर्मचारी तेथे पोहोचले होते. सर्वांनी गांभीर्य ओळखून रामगिरी चौकात पोलिस व्हॅन, तर सिडको चौकात ट्रॅव्हल्स उभी करून रस्ता बंद केला. नियंत्रण कक्षाकडून सर्वांना अलर्ट संदेश पाठविण्यात आला. पोलिस आयुक्त मनोज लोहिया, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांच्यासह सर्व यंत्रणा सतर्क झाली. अग्निशमन विभागाने दाखल होत गॅस नियंत्रणात ठेवण्यासाठी पाण्याचा फवारा सुरू केला. त्यानंतर औद्योगिक वसाहतीमधील आपत्ती व्यवस्थापन समूहांना बोलाविण्यात आले. ‘एचपीसीएल’च्या अधिकाऱ्यांनी देखील तत्काळ धाव घेतली.

१० लाख लिटर पाण्याचा वापर, परिसराला छावणीचे स्वरूप
गॅस गळती झाल्याने आसपासच्या १ ते १.५ किलोमीटर परिसरात धोका निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ आसपासच्या ट्यूशनच्या विद्यार्थ्यांना घरी जाण्यास सांगितले. हॉटेल, होस्टेल रिकामे करण्यात आले. शाळा बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह ३०० पेक्षा अधिक पोलिस सुरक्षेसाठी दाखल झाले. अवघ्या दीड तासात परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले.
- सायंकाळी ५ वाजेपर्यंत गॅस टँकरवर १० लाख लिटर पाण्याचा मारा सुरू होता. यासाठी मनपाचे अग्निशमन बंब उभे करून खासगी टँकरद्वारे ते घटनास्थळी भरण्यात येत होते.
- पोलिसांनी आसपासच्या वसाहती, बाजारपेठांमध्ये त्यांच्या वाहनातून कुटुंबांना गॅस न पेटविण्याचे आवाहन करण्यात आले. घटनास्थळाजवळील कुटुंबांना घर सोडण्यासाठी सांगण्यात आले. त्यामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अखेर गॅस सुरक्षित ट्रान्सफर झाला
प्रशासनाच्या चर्चेनंतर दुपारी १ वाजता अपघातग्रस्त टँकरमधला गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्यावर एकमत झाले. दुपारी ४ वाजता गॅस पूर्ण ट्रान्सफर झाला. तळाशी असलेले उर्वरित लिक्विड काढण्यात आले. तज्ज्ञांनी अनुमती दिल्यानंतर क्रेनद्वारे अपघातग्रस्त टँकर ‘एचपीसीएल’ कंपनीच्या जवळील मैदानावर उभा करण्यात आला. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले, तर जखमी चालकाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.

Web Title: Chhatrapatisambhajinagar Gas Leak:Response time of 6 minutes after first information, 1 million liters of water hit the tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.