छावणी जळीत घटना; योग्य कलमांची वाढ, आराेपीला अटकही होणार
By सुमित डोळे | Published: April 6, 2024 07:56 PM2024-04-06T19:56:39+5:302024-04-06T19:56:55+5:30
पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांचे स्पष्टीकरण, घटनेच्या नेमक्या कारणांचा तज्ज्ञांकडून अहवालही मागवणार
छत्रपती संभाजीनगर : छावणीच्या दाना बाजारमध्ये बुधवारी पहाटे ३:३० वाजता कपड्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत सात जणांचे संपूर्ण कुटुंब आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. यात घरमालक शेख अस्लम शेख युनूस याच्यावर सात जणांच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, चौकशीसाठी ताब्यातही घेतले गेले नाही. मात्र, घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. यात आवश्यक कलमांची वाढ करून आरोपी शेख असलमला अटकदेखील होईल, असे पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी स्पष्ट केले.
शेख असलम शेख युनूस (५५) याच्या चार मजली घराच्या तळमजल्यावरील दुकानाला आग लागून बुधवारी शहराला हादरून टाकणारी घटना घडली. दुसऱ्या मजल्यावर भाड्याने राहणाऱ्या हमिदा बेगम अब्दुल अजीज (५५), त्यांची दोन मुले वसीम शेख (३५), सोहेल (३२), वसीम यांची पत्नी तनवीर (२७), सोहेल यांची पत्नी रेश्मा (२२) व अब्दुल यांची मुले असीम (४) व महानूर ऊर्फ परी (२) यांचा यात मृत्यू झाला. यात असलमच्या अनेक चुकांमुळेच ही आग लागल्याचा निष्कर्ष अग्निशमन विभाग, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पाहणीनंतर काढला होता. मात्र, छावणी पोलिसांनी कलमांमध्ये कुचराई करत केवळ भादंवी ३०४ अ नुसार गुन्हा दाखल केला. उपायुक्त बगाटे यांनी मात्र कलमांमध्ये वाढ करण्याचे आदेश दिल्यानंतर भादंवी ३०४ चे कलम वाढवण्यात आले. महावितरणच्या अहवालानंतर भारतीय विद्युत कायदा १३५ चेही कलम लावण्यात आले.
असलमवर नेमके आरोप काय ?
महावितरणने व्यावसायिक मीटरची जोडणी तोडल्यानंतरही त्याने संपूर्ण दुकान, पाच मशीनचा वापर घरगुती मीटरवर केला. शिवाय, तीनही कुटुंबांतील विजेचा वापर त्याच मीटरवर सुरू होता. महावितरण अधिकाऱ्यांच्या मते, वायर देखील अत्यंत खराब दर्जाची होती.
-अरुंद जिना बांधला. स्वत:च्या मजल्याला गॅलरी ठेवली. मात्र, दुसऱ्या मजल्यावरील घराला गॅलरी, खिडकी, मोकळी जागाच ठेवली नाही.
-या सर्व बाबी धोकेदायक असू शकतात, याची जाणीव असलमला असूनही त्याने त्या चुका केल्या.
काय फरक
भादंवी ३०४ (अ) नुसार हयगयीने मृत्यूस कारण होणे. यात सदोष मनुष्यवध या सदरात न मोडणारी कोणतीही हयगयीची कृती करून व्यक्तीच्या मृत्यूस कारण होईल.
भादंवी ३०४ - मृत्यू घडवून आणण्याच्या किंवा ज्या कृत्यामुळे मृत्यू घडून येण्याचा संभव आहे, अशी जाणीव असूनही ते कृत्य करणे. यात दहा वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षेची तरतूद आहे. बगाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना गंभीर आहे. असलम ला अटक केली जाईल. शिवाय, तज्ञांकडून देखील आम्ही या घटनेच्या नेमक्या कारणांचा स्वतंत्र अहवाल घेणार आहोत. ज्यातून आरोपीला शिक्षा होण्यास मदत मिळेल, असेही बगाटे यांनी स्पष्ट केले.