छ. संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्तांच्या मुलाने आयुष्य संपविले; आई - बाबांसाठी आरशावर लिहिली नोट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 09:01 AM2024-10-14T09:01:37+5:302024-10-14T09:35:00+5:30
सकाळी वडील मार्निंग वॉकला बाहेर जाण्यासाठी निघाले असता, तेव्हा मुलाने बेडरूममध्येच आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.
लोकमत न्यूज नेटवर्क,
छत्रपती संभाजीनगर : बारावीत शिकणाऱ्या साहिल शीलवंत नांदेडकर (१७, रा. स्नेहनगर) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी (दि.१३) सकाळी ६ वाजता उघडकीस आले. शहर पोलिस दलातील पोलिस उपायुक्त (प्रशासन) शीलवंत नांदेडकर यांचा साहिल हा मुलगा आहे. यामुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
साहिल हा आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जेईई अॅडव्हान्स परीक्षेची तयारी करीत होता. तो अभ्यासातही अतिशय हुशार होता. मात्र, टोकाचे पाऊल उचलल्यामुळे त्याच्या नातेवाइकांसह संपूर्ण शहर पोलिस प्रशासनालाच धक्का बसला आहे. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल आई-वडिलांसह शनिवारी रात्री उशिरापर्यंत सोबत होता. सकाळी वडील मार्निंग वॉकला बाहेर जाण्यासाठी निघाले असता, तेव्हा मुलाने बेडरूममध्येच आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी तपासून त्याला मृत घोषित केले. साहिलवर प्रतापनगर स्मशानभूमीत दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी, निरीक्षक, राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील नागरिकांची उपस्थिती होती. साहिलच्या पश्चात आई, वडील, आजी, आजोबा आहेत.
आरशावर लिहिली चिठ्ठी...
आत्महत्येपूर्वी घरातील आरशावर साहिलने नवीन जीवनाला सुरुवात करीत असल्याचे लिहीत आई- वडिलांविषयी प्रेम व्यक्त केले आहे.