आयपीएल सट्टा प्रकरणाचा मुख्य सूत्रधार जयपूरचा
By Admin | Published: June 5, 2016 12:09 AM2016-06-05T00:09:11+5:302016-06-05T00:44:41+5:30
औरंगाबाद : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यांवर चालविण्यात येणाऱ्या सट्ट्याचा अड्डा गत सप्ताहात गारखेडा परिसरातील आर. बी. हिल्स येथे उद्ध्वस्त केला.
औरंगाबाद : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यांवर चालविण्यात येणाऱ्या सट्ट्याचा अड्डा गत सप्ताहात गारखेडा परिसरातील आर. बी. हिल्स येथे उद्ध्वस्त केला. सट्टा प्रकरणाचा स्थानिक सूत्रधार नरेश पोतलवाडसह दोन जण पोलीस कोठडीत आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पोतलवाड यास लाईन देणारा मुख्य सूत्रधार राजस्थानमधील जयपूर येथील असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी कारवाई केली त्या दिवशी पोतलवाडच्या मिनी टेलिफोन एक्स्चेंजशी कनेक्ट असलेल्या ३८ मोबाईलपैकी ३१ बुकींची नावे आणि पत्ते मोबाईल कंपन्यांकडून मागविले आहेत. याविषयी प्राप्त माहिती अशी की, आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील विविध सामन्यांवर शहरात आॅनलाईन सट्ट्याचा अड्डा २९ मे रोजी रात्री गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखा यांनी संयुक्त कारवाई करून उद्ध्वस्त केला होता. गारखेडा परिसरातील आर. बी. हिल्स येथील एका फ्लॅटमध्ये गुपचूप हा अड्डा आरोपी नरेश पोतलवाड याने सुरू केला होता. पोतलवाडला गतवर्षीही उस्मानपुरा परिसरात सट्टा खेळविताना पकडण्यात आले होते. २९ मे रोजी रात्री पोलिसांनी छापा मारून अजित आगळे ऊर्फ छोटू आणि प्रकाश ठोले यांना अटक केली होती. पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी पोतलवाडच्या मिनी टेलिफोन एक्स्चेंजसोबत ३८ बुकी आॅनलाईन होते. त्यांचे वेगवेगळे मोबाईल सीमकार्डसह जोडण्यात आलेले होते. पोलिसांनी हे मोबाईल जप्त केलेले आहेत. त्यातील सीमकार्डच्या आधारे संबंधित मोबाईल कंपन्यांना पत्र पाठवून सीमकार्ड कोणाच्या नावे आहे.
शिवाय सीमकार्ड घेताना त्यांनी दिलेली कागदपत्रे मागविली आहेत. प्राथमिक चौकशीत ३८ पैकी ७ मोबाईल हे एकट्या पोतलवाडच्या नावे असल्याचे समोर आले आहे. उर्वरित ३१ मोबाईल हे यवतमाळ, पुसद, धर्माबाद, नांदेड आणि विदर्भातील अन्य गावांतील बुकींची आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे आणि त्यांचे सहकारी या प्रकरणाचा तपास करीत आहेत. पोलिसांनी विविध मोबाईल कंपन्यांना पत्र पाठवून ३१ आरोपींनी सीमकार्ड खरेदी करताना कंपनीला दिलेले आधार कार्ड, मतदान कार्डसह त्यांची नावे आणि पत्त्याची माहिती मागविली आहे.
पोतलवाड तोंड उघडेना
आरोपी पोतलवाड हा सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्याकडून आयपीएल सट्ट्याचा प्रमुख हा जयपूर (राजस्थान) येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो तोंड उघडत नसल्याने जयपूर येथील आरोपीचे नाव आणि पत्ता सहा दिवसांनंतरही पोलिसांना मिळाला नाही.