‘अंबाला’ पॅटर्नच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसोबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतले जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 07:29 PM2018-11-28T19:29:07+5:302018-11-28T19:34:53+5:30
ऊस तोडणीला आई-वडिलांसोबत गेलेल्या विद्यार्थ्यांना फडातून परत आणून प्रशासनाने शाळेत दाखल केले आहे.
औरंगाबाद : ऊस तोडणीला आई-वडिलांसोबत गेलेल्या विद्यार्थ्यांना फडातून परत आणून प्रशासनाने शाळेत दाखल केले आहे. यासाठी अंबाला येथे ऊसतोड मंजुरांच्या पाल्यांचे वसतिगृह सुरू करण्यात आले. दिवाळीनंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी अंबाला येथील वसतिगृहाला सायंकाळी ८ वाजता भेट दिली. विद्यार्थ्यांसोबत जेवणाचा आस्वादही घेत त्यांनी समस्या जाणून घेतल्या.
ऊसतोडणीला जाण्यापासून परावृत्त केलेले ३३० विद्यार्थी कन्नड तालुक्यातील अंबाला येथील शाळेत आहेत. यातील १४८ विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची व्यवस्था अंबाला गावात करण्यात आली आहे. हे विद्यार्थी ऊसतोडणीसाठी गुजरात, नंदुरबार, सातारा, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर आदी ठिकाणी गेले होते. या सर्वांना बालरक्षक पथकांच्या माध्यमातून परत आणण्यात यश आले. दिवाळीनंतर या विद्यार्थ्यांची शाळा सोमवारी (दि.२६) पहिल्यादांच भरली. याच दिवशी सायंकाळी ८ वाजता जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट दिली.
यावेळी कन्नडचे गटशिक्षणाधिरी, विस्तार अधिकारी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना राहण्यासाठी केलेल्या व्यवस्थेची पाहणी करीत सीईओंनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वसतिगृहातील खोल्यांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. यानंतर विद्यार्थ्यांसोबत पंगतीमध्ये बसून जेवणाचा आस्वादही त्यांनी घेतला. यावेळी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था वेगळ्या ठिकाणी केली होती; मात्र विद्यार्थिनींच्या पंगतीला बसूनच त्यांनी जेवण केल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
मनस्वी आनंद वाटला
मागील अनेक दिवसांपासून ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे स्थलांतर रोखण्याची प्रक्रिया सुरू आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना भेट दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून माझ्या सात महिन्यांच्या औरंगाबादेतील कारकीर्दीत आज मनस्वी आनंद झाला आहे. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करील, असा विश्वास पवनीत कौर यांनी व्यक्त केला.