मुख्यमंत्री उद्या औरंगाबादेत; शहरासाठी नव्याने घोषणेचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 12:33 PM2021-02-04T12:33:16+5:302021-02-04T12:36:14+5:30
जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर शहरासाठी नव्याने काही घोषणा करण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी (दि. ५) शहरात येत असून, जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर शहरासाठी नव्याने काही घोषणा करण्याची शक्यता आहे. सातारा-देवळाईसह शहराला नव्याने काही मिळेल, मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील एखाद्या उपक्रमाची घोषणा होईल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली.
मुख्यमंत्री ठाकरे येण्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तालयात बुधवारी आढावा बैठक झाली. आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासह जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले की, शहर पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलकुंभाचे काम दोन ठिकाणी सुरू होत आहे. त्या अनुषंगाने वेळ असल्यास मुख्यमंत्री पाहणी करतील. गरवारे स्टेडियम आणि दिल्ली गेट येथे कंत्राटदार काम सुरू करणार आहे. कंत्राटदाराला जलवाहिनीच्या कामाची वर्कऑर्डर देण्यात आली आहे. हे सगळे झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात काही क्षणासाठी जिल्ह्याचे अॅचिव्हमेंट काय याबाबत आढावा बैठक होईल. तसेच जिल्हा क्रीडा संकुलाच्या सद्य:स्थितीचे ते अवलोकन करतील. संकुलासाठी २५ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून, २०१९ पासून वर्कऑर्डर देऊनही ते काम कोरोनाच्या परिस्थितीमुळे सुरू झालेले नाही.
सिटी सेंटरचे ऑनलाइन भूमिपूजन
सिटी सेंटरचे ऑनलाइन भूमिपूजन मुख्यमंत्री ठाकरे करतील. तेथील जागा दीड एकर आहे तेथे अॅम्पी थिएटर, पोलीस बँड आणि आर्मीतील बॅण्ड पथक आठवड्यातून एकदा परेड घेतील. ती परेड सामान्यांसाठी उपलब्ध असेल. तसेच किलेअर्क तटबंदीचे संरक्षण, शासकीय महाविद्यालय प्रवेशद्वार सुशोभीकरणासह सुभेदारी विश्रामगृहातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण कामांचा यात समावेश आहे. दोन कोटी रुपयांचा खर्च या कामांसाठी होणार आहे.