उद्धव ठाकरेंनी जनतेचा विश्वासघात करून पाठीत खंजीर खुपसला, एकनाथ शिंदेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 05:32 PM2024-05-11T17:32:26+5:302024-05-11T17:33:43+5:30
पन्नास आमदार सत्तेला ठोकर मारून बाहेर पडले. कारण शिवसेनेचे खच्चीकरण होत होते.
वैजापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीला मतदान करणाऱ्या जनतेचा त्यांनी विश्वासघात केला आहे. काँग्रेसचे राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात. ते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. मग अशा लोकांच्या हातात देश देण्यापेक्षा पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या हातात देश द्या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी वैजापूर येथे केले. लोकसभेच्या तीनही टप्प्यात महायुती बाजी मारत आहे, असे ते म्हणाले.
महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर शिंदे यांची जाहीर सभा झाली. सभेला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार व उदय सामंत, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ. संजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पन्नास आमदार सत्तेला ठोकर मारून बाहेर पडले. कारण शिवसेनेचे खच्चीकरण होत होते. शिवसैनिकांना दुय्यम वागणूक मिळत होती. या पार्श्वभूमीवर सत्तांतर झाले. सत्ता येते, जाते पण नाव एकदा गेले की परत येत नाही, हे बाळासाहेबांचे शब्द होते. शिवसेनेचे दुकान बंद करेन पण काँग्रेससोबत जाणार नाही, हे बाळासाहेबांचे विचार होते. पण हे विचार सोडून जनतेचा विश्वासघात करून पाठीत खंजीर खुपसण्याचे काम कुणी केले? सत्तेसाठी शिवसेना संपत असताना उघड्या डोळ्यांनी बघत राहण्याचे काम त्यांनी केले. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची विचारपूस करतात. महायुतीच्या सरकारने दोन वर्षांत शेतकरी, कष्टकरी, महिलांसाठी अनेक योजना आणल्या, असे ते म्हणाले. संविधान बदलण्याची अफवा पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, असेही शिंदे म्हणाले. संदिपान भुमरे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली. त्यांनी वीस वर्षांच्या काळात एकही काम केले नाही. वीस वर्षे केंद्रात असूनही खैरे यांना केंद्राची एकही योजना माहिती नाही, असे ते म्हणाले.
प्रास्ताविकात आ. रमेश बोरनारे यांनी वैजापूर शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र पॅकेज देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. तालुक्यातील रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेचे कर्ज कॅबिनेटच्या शेवटच्या बैठकीत माफ केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी कैलास पाटील, संजना जाधव, एकनाथ जाधव, डॉ. दिनेश परदेशी, कल्याण दांगोडे, साबेर खान, पंकज ठोंबरे आदी उपस्थित होते.
नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडणार
नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. वैजापृूरचा पाणी प्रश्न सोडवल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही. मराठवाडा वाॅटर ग्रीडच्या माध्यमातून घरोघरी पाणी मिळणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
ही आनंदाची बाब
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वीच न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर नावावर शिक्कामोर्तब केले ही आनंदाची बाब आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे संभाजीनगरवर विशेष प्रेम होते. मुंबई, ठाण्यानंतर या वाघाने संभाजीनगरमध्ये डरकाळी फोडली होती, असेही त्यांनी सांगितले.