'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात काढणार धनुष्यबाण यात्रा, सुरुवात संभाजीनगरमधून होणार'
By बापू सोळुंके | Published: March 26, 2023 05:36 PM2023-03-26T17:36:05+5:302023-03-26T17:37:00+5:30
उद्धव ठाकरे यांनी अधिकार नसताना त्यांच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये शहराचे नाव बदल्याचा ठराव घेतची टिका त्यांनी केली.
छत्रपती संभाजीनगर : ४०आमदार आणि १२ खासदारांसह उठाव केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाणचिन्हं देऊन शिक्कामोर्तब केलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात धनुष्यबाण यात्रा काढणार आहेत. या यात्रेची सुरवात ८ किंवा ९ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथून ते सुरवात करतील. यानिमित्ताने त्यांच्या जाहिर सभेचे आयोजन टीव्ही सेंटर येथे करण्यात आल्याची घोषणा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केली.
धनुष्यबाण यात्रेची पूर्व तयारी करण्यासाठी शिंदे गटाचा पदाधिकारी मेळावा राज्याचे रोहयोमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली संत एकनाथ रंगमंदीरात पार पडला. या मेळाव्याला कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, आ.प्रदीप जैस्वाल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, रमेश पवार, भरतसिंग राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मेळाव्याला मार्गदर्शन करताना पालकमंत्री भुमरे म्हणाले की, हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराला छत्रपती संभाजीनगर हे नाव दिले. सत्तांतरानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा ठराव घेतला आणि केंद्र सरकारला पाठविला. केंद्र सरकारनेही झटपट यावर शिक्कामोर्तब केले. तर उद्धव ठाकरे यांनी अधिकार नसताना त्यांच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये शहराचे नाव बदल्याचा ठराव घेतची टिका त्यांनी केली.