शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांचे शक्तीप्रदर्शन; शहरात वाहन रॅली; २ ठिकाणी जाहीर सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 07:32 PM2022-07-29T19:32:31+5:302022-07-29T19:34:51+5:30
सिल्लोड, वैजापूर येथे जाहीर सभा, तर औरंगाबादेत वाहन रॅली
औरंगाबाद : शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात बंडखोर शिंदे गटाकडून ३० आणि ३१ जुलै रोजी शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वैजापूर येथे ३० जुलै रोजी तर ३१ जुलै रोजी सिल्लोड येथे जाहीर सभा आणि शहरात वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील पाच आमदार शिंदे गटात सहभागी झाल्याने औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेला हादरा बसला आहे. या पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यात आणि शहरात दौरा करून शक्तिप्रदर्शन केले. तेव्हापासून शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू झाली होती. ३० आणि ३१ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन होईल. वैजापूर आणि सिल्लोड येथे त्यांच्या जाहीर सभा होतील, तर औरंगाबाद मध्य मतदारसंघात ते रोड शो करून शक्तिप्रदर्शन करतील.
...असा असेल मुख्यमंत्र्यांचा रोड शो
हर्सूल टी पॉईंट येथून हा रोड शो सुरू होईल. यानंतर टी. व्ही. सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा रोड शो जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भडकलगेट येथे जाईल. तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रोड शो क्रांतीचौकात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर या रोड शोचा समारोप होईल. यानंतर ते आ. जैस्वाल आणि आ. शिरसाट यांच्या निवासस्थानी भेट देतील.