मुख्यमंत्र्यांनी केली जलकुंभाच्या कामाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:05 AM2021-02-06T04:05:56+5:302021-02-06T04:05:56+5:30
औरंगाबाद : शहराची तहान भागविण्यासाठी १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले. या योजनेंतर्गत शहरात ५० पेक्षा ...
औरंगाबाद : शहराची तहान भागविण्यासाठी १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले. या योजनेंतर्गत शहरात ५० पेक्षा अधिक जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीगेट येथील नियोजित जलकुंभाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संपूर्ण पाणीपुरवठा योजनेच्या कामाची माहितीसुद्धा घेतली.
दोन दशकांपासून औरंगाबादकर नवीन पाणीपुरवठा योजनेची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. अखेर गुरुवारी प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली. गरवारे क्रीडा संकुल आणि दिल्लीगेट येथे जलकुंभ बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीगेट येथे महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या निवासस्थानाजवळ जलकुंभाच्या कामाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नवीन पाणीपुरवठा योजनेची संपूर्ण माहिती देणारे फलक या ठिकाणी लावण्यात आले होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी अजय सिंग, प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी नवीन पाणीपुरवठा योजनेबद्दल त्यांना थोडक्यात माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी कामाबद्दल समाधान व्यक्त केले. दिल्लीगेट येथे बांधण्यात येणाऱ्या जलकुंभांची क्षमता तीस लाख लिटर इतकी आहे. जलकुंभांची उंची २० मीटर राहणार आहे. ६३ हजार नागरिकांना या जलकुंभाचा फायदा होईल.
संजय केणेकरांना ताब्यात घेतले
भाजपाचे शहराध्यक्ष संजय केणेकर दुपारी साडेबारा वाजता दिल्लीगेट येथे कार्यकर्त्यांसह दाखल झाले. शहराचे नामांतरण आणि इतर मुद्द्यांवर आपल्याला मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचे आहे, असा हट्ट त्यांनी धरला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. १२ डिसेंबर २०२० रोजी मुख्यमंत्री नवीन पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनासाठी गरवारे क्रीडा संकुलावर आले होते तेव्हा केणेकर यांनी असाच हट्ट केला होता.