हैदराबादला जाण्यासाठी ध्वजारोहणाची वेळ बदलली, हा मराठवाड्याचा अपमान: चंद्रकांत खैरे
By बापू सोळुंके | Published: September 17, 2022 11:56 AM2022-09-17T11:56:49+5:302022-09-17T11:57:08+5:30
आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे. असे असताना मुख्यमंत्र्यानी मराठवाड्याच्या स्वातंत्र्यसंग्राम कार्यक्रमाची औपचारिकता 15 मिनिटात पूर्ण केल्याचे दिसून येते.
औरंगाबाद: हैदराबाद येथे कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्र्यानी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सकाळी 7 वाजता ध्वजारोहण करून येथील जनतेचा अपमान केल्याचा आरोप शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केला.
खैरे म्हणाले की, दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी सकाळी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते. मुख्यमंत्र्याच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण होते. सकाळी 9 वाजता ध्वजारोहण केल्या जाते. तत्पूर्वी मुख्यमंत्र्याना पोलीस मानवंदना देतात. या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार होतो. आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे. असे असताना मुख्यमंत्र्यानी मराठवाड्याच्या स्वातंत्र्यसंग्राम कार्यक्रमाची औपचारिकता 15 मिनिटात पूर्ण केल्याचे दिसून येते. तेलंगणा सरकारने हैदराबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी 15 ते 20 मिनिटात येथील कार्यक्रम उरकला. यानंतर ते हैदराबादला रवाना झाले. मुख्यमंत्र्यानी मराठवाड्यातील जनतेचा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप आणि केंद्राच्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री काम करीत असल्याची टीकाही खैरे यांनी केली.
सरकारच्या मंत्र्यात बेबनाव
मुख्य ध्वजारोहण समारंभाला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित नव्हते. ते भाजपचे आहेत. यामुळे ते देवगिरी किल्ला येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाला गेल्याचे दिसून येते. यावरून राज्यातील मुख्यमंत्री आणि त्याच्या मंत्र्यामध्ये बेबनाव असल्याचे दिसून येते असे खैरे म्हणाले.