मुख्यमंत्र्यांनी केली जनतेची दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:05 AM2021-09-24T04:05:17+5:302021-09-24T04:05:17+5:30
औरंगाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजी, माजी आणि भावीच्या गप्पा मारून जनतेची दिशाभूल करीत मराठवाड्याच्या तोंडाला ...
औरंगाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजी, माजी आणि भावीच्या गप्पा मारून जनतेची दिशाभूल करीत मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा आरोप मनसेचे जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केलेल्या योजना, प्रकल्प कोण पूर्ण करणार, त्याचा खर्च किती असेल, त्यासाठी अनुदान राखीव ठेवले आहे काय, याची कोणती माहिती समोर आणली नाही. जायकवाडी धरणात मुबलक पाणी असताना ५ ते ७ दिवसांआड शहरवासीयांना पाणीपुरवठा होतो. नवीन उद्योग येथे येत नाहीत. क्रीडा विद्यापीठ पुण्याला पळविले. नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी लागणाऱ्या अनेक परवानग्या मनपाने घेतलेल्या नाहीत. ती योजना कधी पूर्ण होणार, याची डेडलाइन ठरलेली नाही. खाम नदीचे प्रदूषण झालेले आहे. गुंठेवारी वसाहतींमध्ये पाणीपुरवठा करणारी टँकर लॉबीदेखील सत्ताधाऱ्यांचीच आहे. मराठवाड्याच्या राजधानीची ही अवस्था आहे, तर विभागातील इतर जिल्ह्यांचे काय हाल असतील, असा सवाल दाशरथे यांनी केला.
गुंठेवारी वसाहतीबाबत धूळफेक, विकास आराखड्यात फेरफार करून शहराचे नुकसान करणारांच्या विराेधात मनसे आवाज उठविणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला सुमित खांबेकर, सतनामसिंग गुलाटी, गजन गौडा पाटील, आशिष सुरडकर, अब्दुल रशीद, अशोक पवार, संदीप कुलकर्णी, विशाल विराळे आदींची उपस्थिती होती.