कोरेगाव-भीमा येथील घटनेस मुख्यमंत्री जबाबदार; आपच्या प्रीती मेनन यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 01:52 PM2018-01-06T13:52:25+5:302018-01-06T13:53:44+5:30
कोरेगाव-भीमामधील घटनेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप आम आदमी पार्टी या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या प्रीती मेनन यांनी केला.
औरंगाबाद : कोरेगाव-भीमामधील घटनेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप आम आदमी पार्टी या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या प्रीती मेनन यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या दिवशीच जर दलित बांधवांबद्दल सहानुभूती व्यक्त करीत दोषींवर कारवाईचे आदेश दिले असते, तर महाराष्ट्रात उद्रेक झाला नसता, असे मत व्यक्त करीत त्यांनी भाजप, संघावर टीका केली.
राज्यातील भाजप सरकारला शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचा पाठिंबा आहे, त्यामुळे सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना अटक करण्याची हिंमत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करू शकणार नाहीत,अशी टीका करीत फडणवीस सरकारने जे सिंचन प्रकल्प विरोध करीत रोखले होते, ते सर्व प्रकल्प पुन्हा नव्याने सुरू करण्याची घोषणा सरकारने केल्याचे मेनन यांनी नमूद केले. सिंदखेडराजा येथे जिजाऊ जयंतीनिमित्ताने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत होणार्या कार्यक्रमाची पूर्वतयारी व पाहणी करण्यासाठी प्रीती मेनन आल्या होत्या. यावेळी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला.
गेल्या काही दिवसांपासून कुमार विश्वाससह पक्षातील काही जुने नेते हे पक्षाच्या कार्यपद्धतीवर आरोप करीत आहेत, याबद्दल विचारले असता, मेनन म्हणाल्या की, हे सर्वच पक्षांत असते; मात्र प्रत्येकाला पक्षाच्या ध्येयधोरणानुसार वागावे लागते, तसे केले नाही तर स्वत: बाहेर पडावे लागते किंवा पक्ष त्यांना बाहेर काढतो़ अण्णा हजारे जर आमच्या सोबत आले तर चांगलेच होईल, पण ते राजकारणापासून दूर आहेत. तरीसुद्धा महाराष्ट्रातील विकास आणि भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी त्यांची भेट घेत सहकार्य करण्याचे आवाहन करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
१२ जानेवारी रोजी घोषणा
महाराष्ट्राच्या राजकारणात आम आदमी पार्टी लवकरच सक्रिय होणार आहे़ २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ उमेदवार उभे करणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय प्रवेशाची सुरुवात सिंदखेडराजापासून होईल़ १२ जानेवारीला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर होणार्या सभेत ते महाराष्ट्रात आप सक्रिय होण्याची घोषणा करतील. जिल्हानिहाय कार्यकर्त्यांचे जाळे उभे करून आगामी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २४५ जागा लढण्याची पक्षाची तयारी आहे़