चौपदरीकरण कामाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे
By Admin | Published: August 19, 2016 12:36 AM2016-08-19T00:36:15+5:302016-08-19T00:58:28+5:30
जालना : जिल्ह्यात जालना-भोकरदन आणि जालना-वडीगोद्री रस्त्यांची दुरवस्था झाली होती. अनेक वर्षांनंतर भोकरदन रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला
जालना : जिल्ह्यात जालना-भोकरदन आणि जालना-वडीगोद्री रस्त्यांची दुरवस्था झाली होती. अनेक वर्षांनंतर भोकरदन रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला. मात्र, वडीगोद्री रस्त्याचा प्रश्न कायम असून, याकडे मुख्यमंत्र्यांनीच लक्ष द्यावे, अशी अपेक्षा वाहनधारकांसह नागरिकांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील सर्वच भागांतील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. या पार्श्वभूमीवर जालना-भोकरदन मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय राखीव निधी आणला. या मार्गाचे कामही सुरू झाले आहे. राजूर येथे जाताना भाविकांची गैरसोय होत असे. अनेकवर्षे मागणी करुनही हा प्रश्न सुटू शकलेला नव्हता. मात्र, खा. दानवे यांनी प्रतिष्ठा पणाला लावून निधी खेचून आणला आणि या मार्गाचे कामही सुरू झाले आहे. या रस्त्याला न्याय मिळाला तसाच तो जालना-वडीगोद्री मार्गासही मिळावा, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेकवर्षांपासून या मार्गावरुन ये जा करणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय होत आहे. त्यातच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. काही दिवसांपूर्वी सहकार व शिक्षण महर्षी माजी खा. स्व. अंकुशराव टोपे यांचे निधी झाल्याने टोपे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री याच मार्गाने पाथरवाला येथे गेले होते. तेव्हा या रस्त्याची अवस्था त्यांनी अनुभवली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीच या रस्त्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिने लक्ष घालावे आणि याचे चौपदरीकरणासाठी राज्याच्या तिजोरीतून आकस्मित निधी उपलब्ध करुन द्यावा, जेणेकरुन आर्थिक तरतूद झाली तर या मार्गाचे काम तात्त्काळ सुरू होऊ शकेल. अन्यथा अपघातांची मालिका सुरुच राहील आणि बळींची संख्या वाढतच राहील. जिल्ह्यातील एकमेव रस्त्याची अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे पक्षीय मतभेद विसरुन लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)