शिवजयंती निर्बंध शिथिल करण्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतीलः एकनाथ शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:01 PM2021-02-13T16:01:06+5:302021-02-13T16:01:55+5:30
Shiv Jayanti restrictions in Maharahstra यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शिवजयंती उत्सवावर निर्बंध घातले आहेत.
औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे शिवजयंती उत्सव साजरा करताना नागरिकांसाठी नियमावली ठरवून देण्यात आली आहे. त्यात बदल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील असे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अजून पूर्णपणे ओसरला नसल्याने राज्य सरकारने येत्या १९ फेब्रुवारीला साजऱ्या होत असलेल्या शिवजयंतीसाठी नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन यंदा शिवजयंती उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी शनिवारी महापालिकेत विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवांद साधला. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शिवजयंती उत्सवावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे शिवप्रेमींंमधून संताप व्यक्त केला जात असून, हे निर्बंध मागे घेण्यात यावे, अशी मागणी सुरू आहे. या संदर्भात राज्यशासन विचार करणार आहे का ? असा प्रश्न केला असता ते म्हणाले, कोरोना संसर्गामुळे शिवजयंती उत्सवासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यात बदल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेऊ शकतात.
घरातच साधेपणाने साजरी करण्याची नियमावली
शिवजयंती गड-किल्ल्यांवर साजरी न करता ती घरातच साधेपणाने साजरी करावी. जयंती उत्सवावेळी १० पेक्षा जास्त लोकांनी उपस्थित राहू नये. सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटकांचे सादरीकरण अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. प्रभातफेरी, बाइक रॅली, मिरवणुका काढू नयेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अथवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सचे पालन करावे. ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करावी, असे गृह विभागाने आपल्या नियमावलीत म्हटले आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अजून ओसरलेला नाही. कोरोना संसर्गाची भीती अद्यापही कायम आहे. हे लक्षात घेऊन गृह विभागाने ही नियमावली तयार केली आहे.