मुख्यमंत्री ऑगस्टमध्ये मराठवाडा दौऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 08:06 PM2020-07-30T20:06:45+5:302020-07-30T20:11:01+5:30
मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे पहिल्यांदाच शहरात येणार आहेत.
औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मराठवाडा दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. पालकमंत्री सुभाष देसाईदेखील त्यांच्यासोबत असतील. कोरोनासह विविध घटकांचा मुख्यमंत्री येथून आढावा घेतील. मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे पहिल्यांदाच शहरात येणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असून, त्यामध्ये औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह मराठवाड्यातील काही जणांचा समावेश असणार आहे. पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री ठाकरे औरंगाबादेतून मराठवाड्याची परिस्थिती जाणून घेण्याची शक्यता आहे. जिल्हाप्रमुख तथा आ. अंबादास दानवे यांनी याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे गुरुवारी पुण्याच्या दौऱ्यावर असून, त्यानंतर मराठवाड्याचा दौरा निश्चित होईल.
बिडकीन येथे ५०० एकर जागेवर फूड पार्क उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जानेवारी २०२० मध्ये मसिआने आयोजित केलेल्या औद्योगिक प्रदर्शनात केली होती. त्यानुसार आॅरिक सिटी प्रशासनाने फूड पार्कच्या कामाचा आराखडा तयार करून जागा विकसित करण्यास सुरुवात केली आहे. या दौऱ्यात पार्कचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होण्याची शक्यता प्रशासकीय पातळीवर वर्तविण्यात येत आहे. ५१७ एकर जागेवर फूड पार्क उभारले जाणार असून, यापैकी ६० एकर जागा विकसित आहे. ४५७ एकर जागेचा आराखडा तयार करावा लागणार आहे. त्याचा आराखडा, प्लॅनिंग उद्योगमंत्री देसाई यांना २५ जून रोजी सादर करण्यात आले आहे.