सोयगाव तालुक्यातील सर्व सरपंचांशी आज मुख्यमंत्री बोलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:02 AM2019-05-08T00:02:11+5:302019-05-08T00:02:32+5:30
संवाद : गावविहाय दुष्काळी परिस्थितीचा दूरध्वनीवरुन आढावा घेणार
सोयगाव : सोयगाव तालुक्यातील सर्व ४७ ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: बुधवारी मोबाईलवरून बोलून गावनिहाय दुष्काळी स्थितीचा आढावा घेणार आहेत. तालुका प्रशासनाकडून मंगळवारी तातडीने ४७ सरपंच, त्यांचे पक्ष आणि नावनिहाय भ्रमणध्वनी क्रमांक मागविण्यात आले असून सायंकाळी ही सर्व माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी दिली.
सोयगाव तालुक्यात दुष्काळाच्या अंतिम टप्प्यात दाहकता वाढल्याने स्थिती गंभीर झाली आहे. आगामी महिन्यात आलेल्या खरिपाच्या हंगामाची तयारी करावी की, दुष्काळाशी संघर्ष करावा, अशी द्विधा स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. यावर उपाययोजनेसाठी मुख्यमंत्री थेट मोबाईलवरून गावनिहाय सरपंचांशी संपर्क साधून माहिती घेणार आहेत. एका सरपंचाशी ते पाच मिनिटे बोलणार आहेत.
या विषयांवर विचारणार प्रश्न
गावातील पाण्याची स्थिती, रोजगार हमी योजनेची कामे, गंभीर दुष्काळ असलेल्या गावांची माहिती, इतर अडचणी, अपेक्षा आदी विषयांवर मुख्यमंत्री सरपंचांशी चर्चा करणार आहेत. दरम्यान, गंभीर दुष्काळ असलेल्या गावांची छायाचित्रे तातडीने तालुका प्रशासनाच्या पथकाला अपलोड करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. निवडणुकानंतर सोयगाव तालुक्यातील दुष्काळाच्या संबंधीच्या अडचणी सुटण्याचा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे.