मुख्यमंत्र्यांचा फोन आला, तरीही फुलंब्रीतून शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बंडखोरी कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 07:25 PM2024-11-05T19:25:12+5:302024-11-05T19:26:15+5:30
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीच्या नेत्यांची धावाधाव निष्फळ
फुलंब्री : फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून महायुतीत बंडखोरी केलेले शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रमेश पवार हे दोन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असल्याने सोमवारी उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशीही त्यांचा शोध घेण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी केलेली धावाधाव निष्फळ ठरली.
फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायचीच असा निश्चय करून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रमेश पवार यांनी गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारी चालवली होती. त्यानुसार त्यांनी स्वतंत्र यंत्रणाही राबविली. त्यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वी उमेदवारी अर्जही दाखल केला. येथे महायुतीच्या उमेदवार भाजपाच्या अनुराधा चव्हाण असल्याने महायुतीत बंडखोरी नको म्हणून युतीतील नेत्यांनी त्यांनी अर्ज परत घ्यावा, यासाठी बरेच प्रयत्न चालवले. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ३१ ऑक्टोबर व ४ नोव्हेंबर हे दोनच दिवस मिळाले असताना गेल्या दोन दिवसांपासून पवार हे नॉट रिचेबल होते. उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी महायुतीच्या अनेक नेत्यांनी त्यांचा शोध घेतला; परंतु पवार हे मोबाइल बंद करून अज्ञातस्थळी निघून गेल्याने महायुतीच्या नेत्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. परिणामी सोमवारीही पवार यांनी सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज परत न घेतल्याने महायुतीतील बंडखोरी कायम आहे. त्यांच्या बंडखोरीचा महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांच्या मतावर कितपत परिणाम होतो, हे निवडणूक निकालाअंती समजणार आहे.
मुख्यमंत्र्यांचा फोन, तरीही...
दरम्यान, याबाबत शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश पवार यांच्याशी १ नोव्हेंबर रोजी सदरील प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपणास उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी फोन केला होता; पण आपण उमेदवारी कायम ठेवण्यावर ठाम असल्याचे ते म्हणाले.