मुख्यमंत्र्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृह सुभेदारीत; तर मंत्री पंचतारांकित हॉटेल्समध्ये
By विकास राऊत | Published: September 16, 2023 12:35 PM2023-09-16T12:35:12+5:302023-09-16T12:35:45+5:30
विरोधकांनी टीका केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा सुभेदारी विश्रामगृहात मुक्काम करण्याचा निर्णय
छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुभेदारी ऐवजी पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबणार, यावरून विरोधकांनी टीका केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुभेदारी विश्रामगृहात मुक्काम करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या दौऱ्यातून स्पष्ट झाले. मंत्री मात्र पंचतारांकित हॉटेल मध्ये थांबणार आहेत.
दि. १६ रोजी सकाळी ९ वाजता नवीन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीचे भूमिपूजन व मनपाच्या विकासकामांचे ऑनलाइन भूमिपूजन ते करतील. १०.५५ वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्हा, विभाग, तालुका नामकरण फलकाचे अनावरण ते करतील. ११ वाजता मंत्रिमंडळ बैठक त्यांच्या उपस्थितीत सुरू होईल. त्यानंतर ५.४० वाजता गणेश महासंघ कार्यालय उद्घाटन, ८.३० वाजता गर्जा मराठवाडा या क्रांतिचौकातील सांस्कृतिक कार्यक्रमास हजेरी लावतील. त्यानंतर सुभेदारी विश्रामगृहाकडे मुक्कामी थांबतील. दि. १७ सप्टेंबर रोजी सिद्धार्थ उद्यान येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहणास ते उपस्थित राहतील. दुपारी १.३० वाजता ते विमानतळाकडे रवाना होतील.