वरूडकाझी येथील अवैध कत्तलखान्यांवर चिकलठाणा पोलिसांची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 07:08 PM2019-07-19T19:08:29+5:302019-07-19T19:10:03+5:30
कत्तलखान्याशेजारीच अत्यंत क्रूरपद्धतीने बांधून ठेवलेल्या २० गोवंशची पोलिसांनी मुक्तता केली
औरंगाबाद: वरूडकाझी येथील अवैध कत्तलखान्यावर चिकलठाणा पोलिसांनी शुक्रवारी सकाळी धाड टाकली. यावेळी तेथे तीन गोवंशची हत्या करण्यात आल्याचे आढळले. या कत्तलखान्याशेजारीच अत्यंत क्रूरपद्धतीने बांधून ठेवलेल्या २० गोवंशची पोलिसांनी मुक्तता करीत दोन जणांना अटक केली. यावेळी दोन संशयित पळून गेले. या कारवाईमुळे चोरट्यामार्गाने अवैध कत्तलखाने सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले.
शेख सद्दाम शेख रहेमान (रा.वरूडकाझी), अकबर खलील शेख अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर फय्याज फकीर कुरेशी, फिरोज रफिक कुरेशी अशी पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. राज्यात गोवंश हत्याबंदी लागू करण्यात आली आहे, तेव्हापासून गोवंशची सर्व कत्तलखाने बंद करण्यात आली. तसेच गोवंशची कत्तल करणे कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे. असे असताना वरूड काझी शिवारातील चोरट्यामार्गाने गोवंशची कत्तल केली जाते, अशी माहिती चिकलठाणा ठाण्याचे सहायक निरीक्षक महेश आंधळे यांना मिळाली. यानंतर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिनरीक्षक गोपाल देशमुख, पोलीस कर्मचारी बादलसिंग कवाल, दिनकर थोरे, अजित शेकडे , विशाल नरवडे, गोपाल डवले, सुधाकर बोचरे, दिपक सुरे अनिल जायभाये, दिनकर पांढरे, अण्णा गावंडे, विशाल लोंढे यांना सोबत घेऊन संशयित पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. यावेळी गोवंशची कत्तल करीत असलेल्या चार जणांपैकी शेख सद्दाम आणि अकबर खलील यांना पोलिसांनी पकडले तर फय्याज कुरेशी आणि फिरोज कुरेशी हे पोलिसांना पाहून पळून गेले. यावेळी तेथे तीन गोवंशची मुंडके आणि बारा पाय तेथे कापलेली होती, शिवाय रक्तामांसाचा सडाच तेथे जागोजागी पडलेला होता. मांस लटकावून ठेवले होते. यावेळी पशूवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून घटनास्थळाचा पंचनामा करून गोवंश मांस आणि कत्तलीसाठी वापरलेली शस्त्रे जप्त केली.
क्रुरपणे बांधून ठेवलेल्या २० गुरांची मुक्तता
वरूडकाझी येथील या कत्तलखान्यापासून काही अंतरावर नासेर मन्नू कुरेशी आणि मोहम्मद कालू कुरेशी यांनी त्यांच्या शेतातील गोठ्यात आखूड दाव्यांना २० गोवंश बांधून ठेवल्याचे आढळले. या गुरांना पुरेसे अन्न पाणी न देता त्यांची क्रूरवागणूक देत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी ही सर्व गुरांची मुक्ताता करून त्यांची रवानगी गोशाळेत केली.