सतर्क पित्यामुळे टळले बालिकेचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:46 AM2017-08-25T00:46:17+5:302017-08-25T00:46:17+5:30
अडीच वर्षीय चिमुकलीच्या कानातील सोन्याच्या बाळ्या पाहून एका महिलेने तिला केळीचे आमिष दाखविले अन् चक्क घराजवळूनच तिला पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क पिता आणि परिसरातील महिलांच्या तावडीत ती महिला सापडल्याने तिला पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अडीच वर्षीय चिमुकलीच्या कानातील सोन्याच्या बाळ्या पाहून एका महिलेने तिला केळीचे आमिष दाखविले अन् चक्क घराजवळूनच तिला पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क पिता आणि परिसरातील महिलांच्या तावडीत ती महिला सापडल्याने तिला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. ही खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी १२.३० ते १ वाजेच्या सुमारास धूत हॉस्पिटलसमोरील म्हाडा कॉलनीत घडली.
सुनीता दीपक लोंढे (४०, रा. रामनगर, मुकुंदवाडी), असे अटक केलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, म्हाडा कॉलनीतील रहिवासी नीलेश तेजराव हुसे (३४, मूळ रा. देशगव्हाण, ता. अंबड, जि. जालना) यांची अडीच वर्षांची मुलगी घराजवळ गल्लीत खेळत होती. तिच्या कानात सोन्याच्या काड्या (बाळ्या) होत्या. तेथून जाणाºया सुनीताची नजर सोन्याच्या बाळ्यांवर पडली. तिने झटकन चिमुकलीला केळीचे आमिष दाखविले अन् तिला उचलून सोबत घेऊन ती निघालीसुद्धा. घरापासून अंदाजे शंभर मीटर अंतरापर्यंत ती गेली असताना अचानक तिचे वडील नीलेश घराबाहेर आले. एक महिला मुलीस घेऊन जात असल्याचे दिसल्याने ते पळतच गेले आणि त्या महिलेस आडवे झाले. त्यांनी प्रथम मुलीस तिच्या हातातून हिसकावून घेतले. तेव्हा सुनीताने नीलेश यांनाच शिवीगाळ करीत, ‘येथून जाऊ द्या, नाही तर तुम्हाला छेड काढण्याच्या आणि बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवीन’, अशी धमकी ती देऊ लागली. नीलेश यांनी तात्काळ गल्लीतील महिलांना आवाज देऊन बोलावले. महिला जमा झाल्या आणि त्यांनी सुनीताला पकडले. पोलिसांना ही माहिती कळविण्यात आली. फौजदार विजय जाधव यांचे पथक व एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक श्रीपाद परोपकारी, कर्मचाºयांनी धाव घेऊन आरोपी महिलेस ताब्यात घेऊन ठाण्यात नेले. पोलिसांनी तिची सखोल चौकशी केली. पो.नि. परोपकारी म्हणाले की, चिमुकलीच्या कानातील सोन्याच्या काड्या चोरण्यासाठीच तिने अपहरणाचा प्रयत्न केला होता. हुसे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू होती.