शेतीच्या वाटणीवरुन मुलाने पित्याची केली हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहही जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 07:59 PM2018-05-19T19:59:48+5:302018-05-19T20:06:01+5:30
वडील शेतीची वाटणी करीत नसल्याने पोटच्या मुलानेच त्यांचा लोखंडी चिमट्याने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पीरबावडा शुक्रवारी मध्यरात्री घडली.
फुलंब्री (औरंगाबाद ) : वडील शेतीची वाटणी करीत नसल्याने पोटच्या मुलानेच त्यांचा लोखंडी चिमट्याने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पीरबावडा शुक्रवारी मध्यरात्री घडली. एवढेच नव्हे तर पुरावा नष्ट करण्यासाठी या नराधम मुलाने पित्याचा मृतदेह प-हाट्यावर फेकून पेटवून दिला.
शनिवारी सकाळी हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आल्यावर वडोदबाजार पोलिसांनी आरोपी मुलगा सतीश नारायण गाडेकर (३०) यास अटक केली. नारायण लक्ष्मण गाडेकर (५४, रा. पीरबावडा) असे मयताचे नाव आहे. फुलंब्रीपासून १५ कि.मी. अंतरावर राजूर रस्त्यावर पीरबावडा हे छोटेसे गाव असून तेथे नारायण लक्ष्मण गाडेकर हे दोन मुले, तीन मुली, पत्नीसह राहतात. नारायण गाडेकर यांना आठ एकर शेती असून त्यांनी या शेतीच्या बळावर दोन मुली व एक मुलाचे लग्न केले. एक मुलगा व एका मुलीचे लग्न होणे बाकी आहे.
मोठा मुलगा सतीश याचे तीन वर्षापूर्वीच लग्न झाले असून त्याला पत्नी व दोन मुली आहेत. मला शेतीची वाटणी करून द्या, असा हट्ट तो वडिलांकडे करीत होता. या कारणावरून नेहमीच त्यांची भांडणे होत होती. यातूनच त्याने पित्याचा काटा काढण्याचे ठरविले.
असा केला खून
नारायण गाडेकर हे शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत गावातील गोंधळाच्या कार्यक्रमात होते. यानंतर ते आपल्या शेतात झोपण्यासाठी गेले. हे सतीशला कळताच तो मध्यरात्री दोन वाजता शेतात गेला व झोपलेल्या वडिलांवर काठीने वार केले, पण त्याने काही फायदा झाला नाही. नंतर त्याने कपाशीची झाडे उपटण्याच्या लोखंडी चिमट्याने वडिलांवर सपासप वार केले. यात वडीलांनी जागीच प्राण सोडला. नराधम सतीशने पित्याचा मृतदेह खांद्यावर नेऊन सुमारे दोनचे फूट अंतरावर असलेल्या पºहाट्याच्या फासावर फेकला व आग लावून दिली.
आता पुरावाही नष्ट झाला म्हणून तो घरी गेला. शनिवारी सकाळी स्नान करुन तो परत शेतात गेला असता त्याला मृतदेह अर्धवट जळालेला दिसला. पुन्हा पेटवून देण्यासाठी लाकडे जमा करू लागला. तेव्हा शेजारील मुलाने त्याला हटकले तेव्हा या घटनेची बोंब संपूर्ण गावात झाली. मीच बापाला मारले असे सांगून तो मारसावळी शिवारातील सावळेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेला. तोपर्यंत ग्रामस्थांनी वडोदबाजार पोलिसांना बोलावून घेतले. दर्शन घेत असतानाच पोलिसांनी सतीशला ताब्यात घेतले. त्याने लगेच गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली.
घटनास्थळीच शवविच्छेदन
नारायण गाडेकर यांचा मृतदेह ६० टक्के जळाला होता. त्यामुळे वडोदबाजार प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश सावंत यांनी जागेवरच शवविच्छेदन केले.
आईचा आक्रोश
आपण जन्म दिलेल्या मुलानेच आपले कुंकू पुसल्याने आईचा आक्रोश पाहून उपस्थित व पोलीसही गहीवरले. वडोदबाजार पोलिसांनी सतीशला बेड्या ठोकून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील करीत आहेत.