औरंगाबाद- जळगाव महामार्गाच्या कामावर बालकामगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:24 AM2020-12-17T04:24:04+5:302020-12-17T04:24:04+5:30
फुलंब्री : औरंगाबाद- जळगाव रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम सुरु आहे. या कामावर पाच बालकामगार आढळून आल्याने कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या ...
फुलंब्री : औरंगाबाद- जळगाव रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम सुरु आहे. या कामावर पाच बालकामगार आढळून आल्याने कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून लनको ऋतिक इन्फोटेक, आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर व महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन या तीन कंपन्यांविरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. या कामावर बालकामगार काम करीत असल्याची तक्रार भारतीय मानवाधिकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष इस्माईल शेख सलीम शेख व बबन एकनाथ थोरात यांनी कामगार कार्यालयात याबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी अमोल जाधव यांनी आपल्या सहकार्यांसह महामार्गाच्या कामावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांना तेथे पाच बालकामगार काम करीत असल्याचे आढळून आले. त्यानुसार त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. यानंतर फुलंब्री पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी संबंधित लनको ऋतिक इन्फोटेक,आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर व महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन या तीन कंपन्यांवर गुरुवारी रात्री उशिरा फुलंब्री पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक मुद्दीराज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब कांबळे करीत आहेत.
चौकट
जिल्ह्यात अनेक ठिकाणी बालकामगार
जिल्ह्यात अनेक ठिकाणी परिस्थिती गरीब असल्याने बालकामगार काम करतात. यात हॉटेल, रस्ता कामे, बांधकामे यांचा समावेश आहे. मात्र, याबाबत कोणीही तक्रार करीत नसल्याने त्यांच्या दुखावर कोणी वाचा फोडीत नाही. जिल्ह्यात अनेक दिवसानंतर बालकामगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला आळा बसेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.