कोरोना काळात बालविवाह वाढले, मात्र उरकलेल्या बालविवाहांची माहिती मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:04 AM2021-07-20T04:04:16+5:302021-07-20T04:04:16+5:30

--- ग्रामस्तरावरून तक्रारीही येईनात : लपूनछपून झालेल्या बालविवाहांचे पुढे काय ? ---- औरंगाबाद : लाॅकडाऊनच्या काळात ५५ बालविवाह रोखले ...

Child marriages increased during the Corona period, but no surviving child marriages were reported | कोरोना काळात बालविवाह वाढले, मात्र उरकलेल्या बालविवाहांची माहिती मिळेना

कोरोना काळात बालविवाह वाढले, मात्र उरकलेल्या बालविवाहांची माहिती मिळेना

googlenewsNext

---

ग्रामस्तरावरून तक्रारीही येईनात : लपूनछपून झालेल्या बालविवाहांचे पुढे काय ?

----

औरंगाबाद : लाॅकडाऊनच्या काळात ५५ बालविवाह रोखले गेले. मात्र, त्यापेक्षाही अधिक बालविवाह उरकल्याची भीती सामाजिक कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. बालविवाह रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा प्रत्येक गावात आहे. ‘बालविवाह प्रतिबंध अधिकारी’ म्हणून ग्रामसेवक कार्यरत असताना बालविवाह झाल्याची अधिकृत माहिती शासकीय यंत्रणेकडे येत नाही. जनजागृतीचा अभाव आणि आर्थिक, सामाजिक प्रश्न बिकट होत असल्याने शाळकरी मुलींच्या गळ्यातही मंगळसूत्र सहज दिसते आहे.

जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय बालसंरक्षण कायद्याअंतर्गत जिल्हा आणि गावस्तरावर समित्या आहेत. लाॅकडाऊन काळात बालविवाहांचे प्रमाण वाढल्याचे अधिकारी खासगीत मान्य करतात. मात्र, तक्रार नाही, गुन्हा नोंद नाही. त्यामुळे बालविवाह घडून गेल्याची कोणतीही अधिकृत माहिती नाही. गाव पातळीवरून बालसंरक्षण समित्यांकडून माहिती मिळत नाही. तक्रार आली तर कारवाई करू, अशी हतबलता अधिकारी व्यक्त करत आहेत. गावात बालविवाह घडत असताना माहिती का येत नाही? जिल्ह्यात कोरोनामुक्त गावांतील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या, त्यातील घटलेली पटसंख्येची कारणे शोधल्यास या घटना समोर येतील, असे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

------

सुरू झालेल्या शाळेतील एकूण विद्यार्थी - ६४,२२९

उपस्थित विद्यार्थी - १८,५०९

किती शाळा सुरू - ४८८

किती अद्याप बंद - १७१

---

शाळकरी मुलींच्या गळ्यात मंगळसूत्र

---

-लाॅकडाऊननंतर काही गावांत शाळा सुरू झाल्या. गंगापूर तालुक्यात काही गावांतील उघडलेल्या शाळांत मुलींच्या गळ्यात मंगळसूत्र दिसून आले. मात्र, अद्यापही त्याबद्दल तक्रारी गावातून आलेल्या नाहीत.

-आठवी ते दहावीच्या काळात गावांत लग्न होतात. नावापुरते प्रवेश घेऊन थेट परीक्षेला विद्यार्थिनी येतात. ही वस्तुस्थिती असताना शाळा स्तरावरून अद्याप कोणतीही माहिती महिला बालविकास अधिकारी किंवा चाईल्ड हेल्पलाईनपर्यंत आलेली नाही.

--

पटसंख्या कमी झालेल्या मुली गेल्या कुठे ?

---

आठवीपर्यंत सरसकट पास केल्याने शाळाबाह्य झालेली मुलेही पटावर दिसतात. मात्र, नववी आणि दहावीत परीक्षा अर्ज भरताना अशा शाळाबाह्य झालेल्या मुला-मुलींचा आकडा समोर येतो. दरवर्षी किती मुलींची संख्या घटली त्याची कारणमीमांसा व्हायला हवी. तसेच मुलीचे वय १८, तर मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाह होऊ नये याची शाळा स्तरावर जनजागृती गरजेची आहे.

----

जबाबदारीचे ओझे, आर्थिक विवंचनेचे कारण

---

-गेल्या दीड वर्षांत कंपनीतील कामगार ते वेटबिगारी या सर्वांवरच आर्थिक संकट ओढावले.

-मुलींच्या शिक्षणापेक्षा जबाबदारीला, शिक्षणापेक्षा लग्नाला जास्त महत्त्व दिले जात असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे छुप्या पद्धतीने होणाऱ्या विवाहांबद्दल बालविवाह प्रतिबंधाची यंत्रणा हतबलता व्यक्त करते.

-गावस्तरावर लोक छुप्या विवाहांना मूकसंमती देतात, तक्रारी होत नाही.

-बालविवाह होण्याचे प्रमाण कोरोना काळात वाढल्याचे अधिकारी व सामाजिक कार्यकर्तेही खासगीत मान्य करतात.

-----

चोरून, लपून बालविवाह झाले याचे अधिकृत रेकाॅर्ड उपलब्ध होत नाही. गेल्या वर्षभरात ५५ बालविवाह रोखले. दोन ते तीन गुन्हेही दाखल केले. नुकताच बिडकिनचा बालविवाह रोखला. चाईल्ड लाईन १०९८, बालसंरक्षण समित्या माहिती मिळाल्यावर बालविवाह रोखतात. शिक्षणाधिकाऱ्यांनाही पत्र देऊन शाळास्तरावर माहिती मिळाल्यास कळविण्याबद्दल पत्र देणार आहोत. जे बालविवाह झाले, त्याची कुणी तक्रार दिली तर त्याबद्दल प्रत्येक गावाचा बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून ग्रामसेवकांनी गुन्हा दाखल केला पाहिजे.

-गणेश पुंगळे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी

----

गावागावांत बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून ग्रामसेवक आहेत. बालकल्याण समित्या आहेत. मात्र, कोणीही कुणाच्या विरोधात जायला तयार नाही. त्याला जाती, धर्माच्या चढउताराचे कंगोरेही आहेत. त्यामुळे बालविवाहांच्या तक्रारी येत नाहीत. कोरोना काळात बालविवाहांचे प्रमाण वाढले आहे. छुप्या पद्धतीने हे विवाह होतात. लाॅकडाऊनमुळे गेलेले हातचे काम, मुलींचे शिक्षण आणि जबाबदारीत लग्नाला पालकांकडून पसंती दिली जाते.

-रेणुका कड, कार्यक्रम समन्वयक, विकास अध्ययन केंद्र

----

Web Title: Child marriages increased during the Corona period, but no surviving child marriages were reported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.