पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह टळला
By Admin | Published: June 15, 2016 11:55 PM2016-06-15T23:55:26+5:302016-06-16T00:14:48+5:30
वाळूज महानगर : वाळूज परिसरातील राजुरा गावातील बालविवाह वाळूज पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला असून, त्या अल्पवयीन वधूच्या पालकांचे पोलिसांनी समुपदेशन केले.
वाळूज महानगर : वाळूज परिसरातील राजुरा गावातील बालविवाह वाळूज पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला असून, त्या अल्पवयीन वधूच्या पालकांचे पोलिसांनी समुपदेशन केले. त्यामुळे पालकांनीही मुलगी सज्ञान झाल्यावरच तिचा विवाह लावून देणार असल्याचा लेखी जबाब पोलिसांना दिला.
राजुरा (ता.गंगापूर) येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह मुकुंदवाडी परिसरातील एका तरुणाबरोबर बुधवारी दुपारी ठरला होता. या बालविवाहाची कुणकुण लागताच कुणी तरी वाळूज पोलीस ठाण्यास माहिती दिली. पोलीस निरीक्षक जारवाल, प्रशिक्षणार्थी फौजदार प्रीती फड, सहायक फौजदार आर. एम. वैष्णव, पोहेकॉ. नंदकुमार आव्हाळे, पोहेकॉ. शेळके, पोकॉ. बोरुडे आदींनी तात्काळ राजुरा गावाला भेट दिली.
मंडपात अचानक पोलीस आल्यामुळे नातेवाईक घाबरले. तुमची मुलगी अल्पवयीन असून, कायद्याने तिचा विवाह होणे शक्य नसल्याचे पोलिसांनी वधूच्या आई-वडील व नातेवाईकांना सांगितले. बळजबरीने विवाह लावल्यास तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी वधूच्या नातेवाईकांना दिला.