काकाकडे आलेल्या बालकाचा स्लायडींग गेट अंगावर पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 05:49 PM2021-07-15T17:49:07+5:302021-07-15T18:11:12+5:30
सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास मयूर घराच्या कंम्पाऊंडवालला असलेल्या लोखंडी स्लायडींग गेटवर खेळत होता.
औरंगाबाद : चार दिवस राहण्यासाठी औरंगाबादेतील चुलत्याच्या घरी आलेल्या सहा वर्षीय बालकाच्या अंगावर अंगणातील स्लायडिंग गेट पडल्याने झालेल्या घटनेत त्याचा मृत्यू झाला. ही घटना सातारा परिसरातील विजयंतनगर येथे १५ जुलै रोजी सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास झाली. मयूर भूजंग भांडे (६, रा. मोहजा इंगोले,जि. वाशिम), असे मृत बालकाचे नाव आहे.
मयूरचे चुलते मल्हारी भांडे हे सातारा परिसरातील विजयंतनगर येथे राहतात. चार ते पाच दिवसांपूर्वी मल्हारी हे गावी गेले होते. तेव्हा त्यांनी त्याला औरंगाबादला आणले होते. गुरुवारी सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास मयूर घराच्या कंम्पाऊंडवालला असलेल्या लोखंडी स्लायडींग गेटवर खेळत होता. यावेळी अचानक हे वजनदार गेट स्लायडींगमधून निसटले आणि मयूरच्या अंगावर पडले. गेट पडल्याच्या आवाजाने नातेवाईक धावले. गेटखाली दबलेल्या मयुरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुद्ध पडल्याचे पाहून मल्हारी यांनी त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. अपघात विभागातील डॉक्टरांनी मयूर यास तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस हवालदार बी.सी. राठोड हे घटनेचा तपास करीत आहेत. मयूरला एक मोठा भाऊ असून त्याचे वडिल गावी शेती करतात, असे पोलिसांनी सांगितले. मयूरचे शवविच्छेदन झाल्याने नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याचे पार्थिव गावी नेले.