शहरात बालकांना हळूहळू कोरोनाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:05 AM2021-05-14T04:05:11+5:302021-05-14T04:05:11+5:30
आवाहन : बाधित मुलांवर किमान महिनाभर लक्ष ठेवा लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : कोरोनाच्या विळख्यात आता लहान मुले येऊ ...
आवाहन : बाधित मुलांवर किमान महिनाभर लक्ष ठेवा
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कोरोनाच्या विळख्यात आता लहान मुले येऊ लागली आहेत. बालकांमध्ये संसर्गाचा फैलाव वेगाने होत असल्यामुळे आरोग्य विभाग चिंतेत आहे. प्रशासनाने तिसरी लाट रोखण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
सध्या शून्य ते पाच वयोगटातील १,३३७ आणि पाच ते अठरा वयोगटातील ७,५७९ बालके कोरोनाबाधित आहेत. दुसऱ्या लाटेत बालकांमध्ये कोरोना संसर्गाची झपाट्याने लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या तीन दिवसात ९४ बालके कोरोनाबाधित आढळून आली आहेत. पालकांसह नातेवाईकांकडून बालकांना कोरोना संसर्गाची लागण होत आहे.
दरम्यान, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले, कोरोनातून बरे झालेल्या मुलांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांवर किमान महिनाभर बारकाईने लक्ष ठेवावे, काही आजार असल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवून उपचार घ्यावेत.
बालकांना साधा ताप, सर्दी, खोकला झाला तरी तातडीने डॉक्टरांकडून उपचार करुन घ्यावा. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असतानाच लहान मुले, बालके कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहे. कोरोनाबाधित मुलांना पोस्ट कोविडचा सर्वाधिक धोका असल्यामुळे आरोग्य यंत्रणा नियोजन करत आहे. बालकांना आजाराबद्दल फारसे सांगता येत नाही, अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचा आजार समजून घेतला तर पोस्ट कोविडचा धोका टाळता येऊ शकतो. पोस्ट कोविडमध्ये बालकांना अनेक आजार होण्याचा धोका आहे, असेही डॉ. पाडळकर यांनी सांगितले.